मराठा आरक्षणासाठी जलसमाधी घेणाऱ्या काकासाहेब शिंदेंचा गोदातीरी पुतळा
मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेऊन प्राणार्पण करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा औरंगाबादमधील कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात पुतळा बसवण्यात आला आहे. सोमवारी (22 जुलै) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा पुतळा बसवण्यात आला.
औरंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेऊन प्राणार्पण करणाऱ्या काकासाहेब शिंदे यांचा औरंगाबादमधील कायगाव टोका येथील गोदावरी नदीच्या पात्रात पुतळा बसवण्यात आला आहे. सोमवारी (22 जुलै) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा पुतळा बसवण्यात आला. काकासाहेब यांनी मराठा आंदोलनादरम्यान आरक्षणाची मागणी करत कायगाव टोका येथेच नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.
काकासाहेब शिंदे यांच्या बलिदानाच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण होत असल्याने स्थानिकांनी त्यांचा पुतळा बसवण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, मागील काही काळात मराठा समाजाच्यावतीने आरक्षणाची मागणी करत राज्यभरात लाखोंच्या संख्येने मुक मोर्चे काढले गेले. त्यानंतरही मराठा आरक्षणावर ठोस असा निर्णय होताना दिसला नव्हता. त्यामुळे अखरेच्या टप्प्यात या शांतताप्रिय मुक मोर्चातील एक गट आक्रमक झाला होता. त्यांनी मराठा ठोक मोर्चाच्या माध्यमातून आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर राज्यभरातूनही मराठा समाजाच्या तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली होती.
महाराष्ट्र सरकारने मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत बहुमताने मंजूर केल्यानंतर उच्च न्यायालयानेही त्याला मान्यता दिली आहे. मात्र, सध्या या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यापूर्वीच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाविरोधातील याचिकेच्या सुनावणीला मान्यता दिली होती. याचवेळी न्यायालयाने आरक्षणावर स्थगिती देण्यास मनाई केली होती.
बलिदानानंतर काकासाहेब शिंदेंचा भाऊ काय म्हणाला होता?
सरकारने दिलेल्या आरक्षणाचं स्वागत आहे. पण आरक्षण कोर्टात टिकलं नाही तर काकासाहेबांचं बलिदान व्यर्थ जाईल. आरक्षण टिकणं महत्त्वाचंय, कारण, 42 तरुणांनी यासाठी आत्महत्या केली आहे. पहिल्या सरकारनेही तेच सांगितलं होतं आणि या सरकारनेही हेच सांगितलंय. शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न जसाय, तसंच आरक्षणाबाबतही होणार आहे. निवडणूक जिंकण्याच्या हेतूने हे आरक्षण टिकवलं जाईल आणि नंतर कोर्टात आव्हान दिलं जाईल, अशी भीती काकासाहेबांच्या भावाने व्यक्त केली होती. दरम्यान, काकासाहेबांच्या आत्महत्येनंतर त्यांच्या भावाला सरकारी नोकरीचं आश्वासन देण्यात आलं होतं.