विवाहबाह्य संबंधाचा राग, पिंपरीत तरुणाकडून बहिणीच्या नवऱ्याची हत्या
45 वर्षीय मोहन लेवडे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या रागातून भोसरीमध्ये 30 वर्षीय मेहुणा विष्णू जगाडेने त्यांची हत्या केली
पिंपरी चिंचवड : बहिणीच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या रागातून मेहुण्याने त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpari Brother in Law Murder) घडला आहे. हत्येनंतर आरोपी पोलिसांना शरण गेला.
पिंपरी चिंचवड तालुक्यातील भोसरीमध्ये काल (रविवारी) रात्री दोन वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. 45 वर्षीय मोहन लेवडे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याने 30 वर्षीय आरोपी मेहुणा विष्णू जगाडे याच्या मनात राग धुमसत होता. विष्णूने दाजी मोहन लेवडे यांना समजवण्याचा कित्येकदा प्रयत्न केला होता. मात्र ते ऐकत नसल्याने विष्णूचा संताप होत होता.
आरोपी विष्णू रविवारी रात्री दाजींसोबत या विषयावर बोलत असताना दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यावेळी विष्णूने दाजींवर कोयत्याने सपासप वार केले. नवऱ्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकून आरोपीची 35 वर्षीय बहीण नंदा धावत आली. भावाच्या हातात कोयता पाहून तिला घडलेला प्रकार समजला.
दरम्यान, हत्येनंतर स्वतः पोलिसांना फोन करुन विष्णूने हत्याकांडाची माहिती दिली आणि तो पोलिसांच्या हवाली झाला. दाजीचे विवाहबाह्य संबंध असल्याने हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. बहीण नंदाच्या फिर्यादीनंतर भोसरी पोलिसांनी आरोपीला (Pimpari Brother in Law Murder) ताब्यात घेतलं.