सोलापुरात कृत्रिम पावसाच्या हालचाली, ढगांच्या अभ्यासासाठी विमानाचं उड्डाण
सोलापुरात कृत्रिम पावसासाठी आवश्यक असणाऱ्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी विमानाचं पाहिलं उड्डाण सोलापूरच्या विमानतळावरून झालं. त्यामुळे आता खरंच पाऊस पडेल का? किंवा गेल्यावर्षीप्रमाणेच कृत्रिम पावसाचा फुसका बार उडणार याची चर्चा होऊ लागली आहे.
सोलापूर : पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीही महाराष्ट्रातील बहुतांश भाग अजूनही कोरडाच आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांची चिंता प्रचंड वाढली आहे. राज्य सरकारने आता कृत्रिम पावसाची (Artificial rain) तयारी सुरु केली आहे. सोलापुरात कृत्रिम पावसासाठी आवश्यक असणाऱ्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी विमानाचं पाहिलं उड्डाण सोलापूरच्या विमानतळावरून झालं. त्यामुळे आता खरंच पाऊस पडेल का? किंवा गेल्यावर्षीप्रमाणेच कृत्रिम पावसाचा फुसका बार उडणार याची चर्चा होऊ लागली आहे.
राज्य सरकारच्या वतीने जे प्रयोग केले जाणार आहेत, त्यासाठी औरंगाबाद येथे रडार उभं करण्यात आलं आहे. केंद्र सरकारकडून कृत्रिम पाऊस पाडण्यासाडी ढगांचा अभ्यास करण्यासाठी सोलापुरात गेल्या दोन-तीन वर्षांपासून निरीक्षण केंद्र उभं करण्यात आलंय. पुण्याच्या आयआयटीएममधील संशोधक गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोलापूरच्या परिसरातील ढगांचा अभ्यास करुन कृत्रिम पाऊस पाडण्यायोग्य वातावरण आहे का याचा अभ्यास करत आहेत. कायपिक्स नावाच्या राष्ट्रीय प्रयोगाचा हा भाग असून यासाठी विमान सोलापूर विमानतळावर दाखल झालं. डीजीसीएच्या परवानगीनंतर विमानाने सोलापूर विमानतळावरून उड्डाण घेतलं.
विमानाद्वारे ढगांचा अभ्यास करण्यात येणार आहे. गेल्यावर्षी केंद्र शासनाच्या वतीने जे रडार सोलापुरात उपलब्ध आहेत, त्याचा वापर करत 83 नमुन्यांचं संकलन या निरीक्षण केंद्राने अभ्यासलं. हे नमुने तपासले असता सोलापूरच्या सभोवताली 200 किमी परिसरात कृत्रिम पाऊस पाडण्यास अनुकूल असे ढग असल्याचा दावा संशोधकांनी केला. त्यामुळे या विमानाद्वारे 200 किमी रेडियसमधील ढगांचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानंतर पावसासाठी आवश्यक असलेले ढग असतील तर क्लाऊड सीडिंग (Cloud Seeding) करण्यात येणार आहे.