International Yoga Day 2020: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचा महत्त्वाचा संदेश
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे योग दिनानिमित्त संदेश दिला (PM Narendra Modi on International Yoga Day 2020).
नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जगभरात एकत्र न येत लोक आपआपल्या घरीच आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे योग दिनानिमित्त संदेश दिला (PM Narendra Modi on International Yoga Day 2020). जगभरात पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय योग दिवस 21 जून 2015 रोजी साजरा करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी हा दिवस उत्साहात साजरा केला जात आहे. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग दिवसाची थीम ‘घरीच योगासन, कुटुंबासोबत योगासन’ अशी ठेवण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, “एक सजग नागरिक म्हणून आपण कुटुंब आणि समाज म्हणून एकजुटीने पुढे जाऊ. घरीच योगासन आणि कुटुंबासोबत योगासन याला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्यासाठी आपण प्रयत्न करुयात. यात आपण नक्कीच यशस्वी होऊ. आपल्याकडे असं म्हटलं आहे, की ‘युक्त आहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्ना-व-बोधस्य, योगो भवति दु:खहा’. म्हणजे योग्य आहार, योग्यप्रकारे खेळणे, झोपणे आणि उठणे आणि आपलं काम योग्यप्रकारे करणे हाच योग आहे. गीतेत भगवानांनी देखील म्हटलं आहे, ‘योगः कर्मसु कौशलम्’, म्हणजेच आपलं कर्म कुशलतेने करणं हाच योग आहे.”
“योग आपल्याला आरोग्यदायी आयुष्याकडे नेतो. यामुळे मानवी संबंधांवरही खोलवर परिणाम होतो. योग भेदभावापासून अलिप्त आहे. योग जात, रंग, लिंग, श्रद्धा आणि राष्ट्राच्या पलिकडचा आहे. जर आपण आरोग्य आणि आपल्या आशा-अपेक्षा यांना दुरुस्त केलं, तर जग नक्कीच आरोग्यदायी आणि आनंदी जगण्याचा साक्षीदार होईल. योग यात नक्कीच मदत करेल,” असंही मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी म्हणाले, “स्वामी विवेकानंद म्हणतात “एक आदर्श व्यक्ती तिच आहे जी अत्यंत निर्जनस्थितीत देखील क्रियाशील राहते आणि अत्यंत गतीशील स्थितीत देखील पूर्ण शांततेचा अनुभव घेते. कोणत्याही व्यक्तीसाठी ही खूप मोठी क्षमता आहे. तुम्ही आपल्या दररोजच्या जगण्यात प्राणायाम करा. अनुलोम-विलोमसोबतच इतर प्राणायाम देखील शिका.”
देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील ट्वीट करत योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या खूप शुभेच्छा. प्राचीन योग विज्ञान भारताची मानवतेला अमुल्य भेट आहे. अधिकाधिक लोक योगला आपल्या आयुष्याचा भाग बनवत आहेत याचा मला आनंद आहे. संघर्ष आणि तणाव, तसेच कोविड-19 सारख्या स्थितीत शरीराला निरोगी आणि मनाला शांत ठेवण्यासाठी योग मदत करतो.”
हेही वाचा :
गलवान खोऱ्यात चिनी घुसखोरीवरुन काँग्रेसचे प्रश्न, पंतप्रधान कार्यालयाकडून स्पष्टीकरण
PM Modi All Party Meet Live | भारतीय सेना भारत भूमीचं रक्षण करण्यास सक्षम : पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Narendra Modi on International Yoga Day 2020