‘लॉकडाऊन’च्या मुदतवाढीचा फैसला ‘या’ दिवशी होणार
तूर्तास तरी 14 एप्रिलला लॉकडाऊन उठवणे अशक्य असल्याचे संकेत नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. (PM Narendra Modi to decide on Corona Lockdown Extension)
नवी दिल्ली : देशात आणीबाणीसदृश्य परिस्थिती असून 14 एप्रिलला लॉकडाऊन उठवणे अशक्य असल्याचा सूर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बोलण्यातून उमटला आहे. नरेंद्र मोदी शनिवार 11 एप्रिलला पुन्हा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असून लॉकडाऊनच्या मुदतवाढीचा फैसला याच दिवशी होण्याची चिन्ह आहेत. देशात आणीबाणी लागू होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. (PM Narendra Modi to decide on Corona Lockdown Extension)
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनची मुदत 14 एप्रिलपर्यंत आहे. मात्र अद्यापही भारतात कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात नसल्याने तो पुढे वाढवला जाण्याचे संकेत आहेत. मात्र लॉकडाऊन कायम राहणार, की संपणार, त्याची घोषणा कधी होणार, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहे.
तूर्तास तरी 14 एप्रिलला लॉकडाऊन उठवणे अशक्य असल्याचे संकेत नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापासून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही तसं सूतोवाच केलं आहेच. कोरोनाचा जिथून फैलाव झाला, त्या चीनमधील वुहानमध्ये झालेल्या 76 दिवसांच्या लॉकडाऊनचा दाखला कालच उद्धव ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी किती ताणावे लागेल, याची चुणूक त्यांनी दाखवली.
लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने काढावा असाही एक पर्याय व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे आणि आसपासचा परिसर, पुणे-पिंपरी चिंचवड, सांगली, अहमदनगर यासारख्या जिल्ह्यांना ‘कोरोना’चा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे कोरोनाचा शिरकाव न झालेल्या जिल्ह्याच्या सीमा बंदच ठेऊन अंतर्गत लॉकडाऊन अंशत: शिथील होण्याची शक्यता वर्तवली जाते.
दुसरीकडे, विविध राज्यांच्या अहवालामध्येही लॉकडाऊन चालूच ठेवण्याचा सूर असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आतापर्यंत सात राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. मध्य प्रदेश, तेलंगणा, राजस्थान, हरियाणा, केरळ आणि दिल्ली सरकारची ही मागणी आहे. राज्यांच्या मागणीवर केंद्रही अनुकूल आहे, परंतु केंद्राने लॉकडाऊन न वाढवल्यास राज्य सरकार लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आहे.
कोण कोणते मुख्यमंत्री लॉकडाऊनच्या वाढवण्याच्या बाजूने?
1. उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री महाराष्ट्र 2. शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्य प्रदेश 3. अशोक गहलोत, मुख्यमंत्री राजस्थान 4. अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री दिल्ली 5. के चंद्रशेखर राव, मुख्यमंत्री तेलंगणा 6. पी. विजयन, मुख्यमंत्री, केरळ 7. मनोहर लाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाणा
Had an in-depth interaction with leaders of various political parties earlier today. Leaders shared their views on tackling COVID-19 and the way ahead. https://t.co/XoDKj52MoW
— Narendra Modi (@narendramodi) April 8, 2020
(PM Narendra Modi to decide on Corona Lockdown Extension)