प्लॅस्टिकविरोधात जनआंदोलन छेडा, ‘मन की बात’मधून नरेंद्र मोदींचं आवाहन
एकीकडे सुदर्शन चक्रधारी मोहन आहे, तर दुसरीकडे चरखाधारी मोहन (महात्मा गांधी) आहे. दोन ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त गांधींजींना 'हागणदारीमुक्त भारत' समर्पित करु आणि प्लॅस्टिकच्या विरोधात जनआंदोलनाला सुरुवात करु, असं आवाहन नरेंद्र मोदींनी 'मन की बात'मधून केलं
मुंबई : जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्ण (Shri Krishna) आणि महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) 150 व्या जयंतीनिमित्त बापूंची आठवण काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘मन की बात’ (Mann Ki Baat) कार्यक्रमाला सुरुवात केली. गांधीजींचं स्वच्छ भारताचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार मोदींनी पुन्हा बोलून दाखवला.
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. एकीकडे सुदर्शन चक्रधारी मोहन आहे, तर दुसरीकडे चरखाधारी मोहन (महात्मा गांधी) आहे. सत्यासोबत गांधींचं जितकं अतूट नातं राहिलंय तितकंच अतूट नातं लोकांची सेवा करण्यामध्येही राहिलं आहे, असं मोदींनी सांगितलं.
दोन ऑक्टोबर रोजी 150 व्या जयंतीनिमित्त गांधींजींना ‘हागणदारीमुक्त भारत’ समर्पित करु आणि प्लॅस्टिकच्या विरोधात एका जनआंदोलनाला सुरुवात करु, असं मोदी म्हणाले. प्लॅस्टिकची पिशवी मिळणार नाही, आपल्यासोबत कापडी किंवा कागदी पिशवी आणावी, असं अनेक दुकानदार, व्यापारी सांगतात. त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर कमी होऊन पैसेही वाचतील आणि पर्यावरणाचं रक्षणही होईल, असं मोदी म्हणतात. प्रत्येक नागरिकाने योगदान देण्याचं आवाहन मोदींनी जनतेला केलं.
गेल्या काही वर्षांपासून आम्ही दोन ऑक्टोबरच्या दोन आठवडे आधीपासून देशभरात ‘स्वच्छताच सेवा’ हे अभियान सुरु करतो. यंदा हा उपक्रम 11 सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती मोदींनी यावेळी दिली.
जागरुकतेअभावी कुपोषणाचा परिणाम गरीब आणि संपन्न दोन्ही प्रकारच्या कुटुंबांवर पडतोय, त्यामुळे याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी सप्टेंबर हा महिना ‘पोषण अभियान’ महिना म्हणून ओळखला जाईल असं मोदींनी सांगितलं.
29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ सुरु करण्याची घोषणा यावेळी मोदींनी केली. ‘मॅन व्हर्सेस वाइल्ड’ या कार्यक्रमामुळे भारतीय संस्कृती, परंपरा, निसर्गाबद्दल असलेली संवेदनशीलता या गोष्टींची जगाला ओळख होईल, असंही मोदी म्हणाले.