जळगाव : शहरात दोन ठिकाणी सुरु असलेल्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यांवर पोलिसांच्या विशेष पथकाने छापा टाकला. सोमवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या 50 जणांना अटक करण्यात आली. कोंबडी बाजारातील जेएमपी मार्केट आणि मनीष कॉम्प्लेक्स येथे हे छापे टाकण्यात आले. यावेळी एकूण 21 लाख 52 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल तसेच 2 महागड्या कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. (police raids on high profile gambling dens, 50 arrests seized 21 lakh rupees)
सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने ही कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव येथील कोंबडी बाजारातील जेएमपी मार्केट आणि मनीष कॉम्प्लेक्स येथे हायप्रोफाईल जुगाराचे अड्डे सुरु असल्याची माहिती पोलिसांच्या विशेष पथकाला मिळाली. त्यानंतर, सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री जेएमपी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावर छापा टाकला.
त्यानंतर दुसरी कारवाई मध्यरात्रीनंतर 2 वाजता जुने बसस्थानक परिसरातील मनीष कॉम्प्लेक्स येथे करण्यात आली. या दोन्ही कारवाईत पोलिसांनी 2 महागड्या कार तसेच 14 दुचाकी जप्त केल्या. विशेष म्हणजे, या कारवाईत अटक केलेल्या जुगाऱ्यांमध्ये राजकीय पुढाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने सोमवारी मध्यरात्री 12 वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील कोंबडी बाजारातील जेएमपी मार्केटमध्ये तिसऱ्या मजल्यावर सुरू असलेल्या खोलीत पहिला छापा टाकला. त्यानंतर दुसरी कारवाई ही मध्यरात्रीनंतर 2 वाजता जुने बसस्थानक परिसरातील मनीष कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत झाली.
पोलिसांनी कोंबडी बाजारातील जेएमपी मार्केटमधील जुगार अड्ड्यावर जुगार खेळणाऱ्या 13 जणांना अटक केली. येथून पोलिसांनी 5 दुचाकींसह 1 लाख 81 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तर, मनीष कॉम्प्लेक्समध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर केलेल्या कारवाईत पोलिसांनी 37 जणांना ताब्यात घेतले. मनीष कॉम्प्लेक्स येथून पोलिसांनी 9 दुचाकी, 2 महागड्या कारसह 19 लाख 70 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या दोन्ही कारवाईप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात 50 जणांविरुद्ध दोन वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (police raids on high profile gambling dens, 50 arrests seized 21 lakh rupees)
संबंधित बातम्या :
यवतमाळमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त, 38 जणांना अटक
संचारबंदीत जुगाराचा डाव, नागपुरात ‘डॉक्टर’ नगरसेवकाला अटक
सांगलीत संचारबंदीचे आदेश झुगारुन घरातच जुगाराचा अड्डा, 1 लाख 4 हजार 590 रुपयांचा मुद्देमाल जप्त