कोल्हापूर : पोलंडवासियांचं दुसरं घर
1942 ते 1948 या काळात पोलंडचे 5 हजार नागरिक निर्वासित म्हणून वळीवडेच्या ज्या भागात रहात होते, तेथे उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाचं अनावरण प्रीझीदॅज यांच्या हस्ते करण्यात आलं. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून या पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं.
कोल्हापूर : भारतापासून हजारो किमी दूर असलेल्या पोलंडच्या नागरिकांसाठी (पॉलिश) भारत दुसरं घर (polish orphans kolhapur valivade) आहे. कारण, दुसऱ्या महायुद्धात कोल्हापुरात निर्वासित पॉलिश लोकांना आश्रय (polish orphans kolhapur valivade) देण्यात आला होता. सध्या पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. 1942 ते 1948 या काळात पोलंडचे 5 हजार नागरिक निर्वासित म्हणून वळीवडेच्या ज्या भागात रहात होते, तेथे उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाचं अनावरण प्रीझीदॅज यांच्या हस्ते करण्यात आलं. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून या पाहुण्यांचं स्वागत करण्यात आलं.
छत्रपती घराण्याकडून जंगी स्वागत
पॉलिश नागरिकांचं कोल्हापुरात छत्रपती घराणे आणि जिल्हा प्रशासनाकडून खास मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करण्यात आलं. छत्रपती संभाजीराजे यांनी या पाहुण्यांना पन्हाळा किल्ला दाखवून इतिहासाबद्दल माहितीही दिली.
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या छळामुळे भयभीत झालेल्या पॉलिश निर्वासितांना ब्रिटिशांचा विरोध झुगारुन भारतात जामनगर आणि करवीर संस्थानात आश्रय देण्यात आला. करवीर संस्थानात 1942 ते 1948 या काळात वळीवडे हे पॉलिश निर्वासितांसाठी हक्काचं घर बनलं. यावेळी वळीवडेत बालपण व्यतीत केलेले पॉलिश नागरिकही सध्या भारत दौऱ्यावर आले आहेत. जुन्या आठवणींना या सर्वांनी उजाळा दिला.
पोलंड ते वळीवडेची कथा
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमध्ये भयभीत झालेल्या नागरिकांची तत्कालीन यूएसएसआरमधील (सध्याचा रशिया) अश्गाबादमधून सुटका झाली. हे सर्व निर्वासित मिळेल त्या मार्गाने भारतात आले. काही पॉलिश अश्गाबादमधून ट्रकमधून निघाले आणि अफगाणिस्तानमार्गे भारतात दाखल झाले.
यानंतर पॉलिश आर्मीकडून आणखी काही नागरिकांची सुटका करण्यात आली. या निर्वासितांना इराणमार्गे कॅस्पियन समुद्रातून भारतात पाठवण्यात आलं. जामनगरच्या महाराजांनी जवळपास एक हजार लहान मुलांसह निर्वासितांना आश्रय दिला. यानंतरचा सर्वात मोठा आणि कायमस्वरुपी आश्रय करवीर संस्थानने दिला. वृद्ध, महिला आणि लहान मुलांसह पाच हजार जणांना करवीर संस्थानमध्ये आश्रय मिळाला होता.