मुंबईः अवकाळी पावसामुळे राज्यभरातील हवामानात बदल दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी दाट धुकं दिसतंय. तर कुठे प्रदुषित हवेचे अच्छादन दिसून येत आहे. राज्यात सर्वाधिक प्रदूषण (Pollution) मुंबईत असल्याचं निदर्शनास आलं आहे. मुंबईतील माझगाव (Mazgaon) आणि कुलाब्यात (Colaba) हवेचा गुणवत्ता स्तर अतिशय वाईट असल्याचे नोंदवण्यात आले. येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक खालावला आहे. माझगावमध्ये 317 तर कुलाब्यात 313 एक्यूआयपर्यंत हा दर घसरला आहे. त्यामुळे दिवसभर मुंबईतील अनेक भागात प्रदुषित धुक्याची चादर पसरलेली दिसून आली. हवेची अशी स्थिती राहिल्यास श्वसनाचे आजार असलेल्यांना श्वास घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
यंदा हिवाळा सुरु झाल्यानंतर राज्यभरात अवकाळी पावसानं काही काळ मुक्काम केला होता. हा पाऊस आता कमी झाला असला तरीही मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत वातावरणात गारवा जाणवत आहे. अशा काळात जमिनीकडून समुद्राकडे वारे वाहू लागतात. त्यामुळे धूलिकण वाहून न जाता जमिनीलगत हवेत तरंगतात. परिणामी प्रदूषणाची पातळी वाढू लागते तर हवा गुणवत्ता निर्देशांकाची पातळी खालावते. त्यात दिवाळीतील फटाक्यांची भर पडली. त्यामुळे हा स्तर आणखीच घसरला असल्याचे सफर या हवेच्या गुणवत्तेची नोंद करणाऱ्या प्रणाली अहवालातून समोर आले आहे.
मुंबईतील कुलाबा आणि माझगाव परिसरात हवा गुणवत्ता निर्देशांक अतिशय वाईट असल्याची नोंद करण्यात आली.
माझगावमध्ये 317 तर कुलाब्यात 313 (AQI) एवढी नोंद झाली. संपूर्ण दिल्ली शहरातील हवेचा AQI 328 एवढा नोंदवण्यात आला आहे. मुंबई 186, बीकेसी 215, मालाड 201, अंधेरी 142, चेंबूर 159, बोरिवली 116 एक्यूआय असा हवेचा दर्जा नोंदवण्यात आला. त्यापैकी कुलाबा, माझगाव, बीकेसी आणि मालाड येथील हवा अतिशय वाईट दर्जाची नोंदवण्यात आली.
एवढ्या प्रदुषित हवेमुळे श्वसनाचे आजार असलेल्या लहान मुले व वृद्धांनी काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. अशा हवेमुळे श्वसनविकारांचा आलेख वाढू शकतो. पोस्ट कोव्हिड रुग्ण, फायब्रोसिस अस्थमा असलेल्यांच्या औषधोपचारात यामुळे वाढ करावी लागू शकते. अशा लोकांनी विनामास्क फिरणे टाळावे, असा सल्ला जेजे रुग्णालयातील श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. प्रीती मेश्राम यांनी दिला.
इतर बातम्या-