अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण; वरिष्ठांच्या अहवालानंतर पोलीस अधिकारी सुरेश वराडेंवर कारवाई?
अन्वय नाईक (Anvay Naik case) यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांचे निलंबन होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
मुंबई : अन्वय नाईक (Anvay Naik case) यांनी आत्महत्या केल्यानंतर त्या प्रकरणाचा तपास करणारे तत्कालीन तपासणी अधिकारी पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांचे निलंबन होणार असल्याचं सांगितलं जात आहे. वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर वराडे यांच्यावर ही कारवाई होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांच्याकडे होती. त्यावेळी चौकशीअंती कोणतेही पुरावे मिळाले नाही म्हणून न्यायालयात क्लोझर रिपोर्ट सादर करण्यात आला. त्यानंतर याच तपासाची चौकशी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून होत आहे. या तपासणी चौकशी अहवालात सुरेश वराडे यांच्यावर तपासात गंभीर त्रुटी ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच त्यांच्यावर निलंबनाचीही कारवाई होणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण नेमकं काय?
मुंबईतील सुप्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक (53) यांनी शनिवारी 5 मे 2018 रोजी अलिबाग येथील कावीर गावातील राहत्या घरी आत्महत्या केली होती. त्याच ठिकाणी त्यांची आई कुमुद नाईक (84) यांचाही मृतदेह आढळून आला होता. तसेच त्यांनी सुसाईड नोटही लिहून ठेवली होती.
अन्वय नाईक हे इंटिरिअर डिझाईनर होते. कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होते. अन्वय यांच्या कॉनकॉर्ड कंपनीने रिपब्लिक टीव्हीचे अर्णव गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरडा यांच्यासाठी डिझाईनिंगचे काम केले होते.
हे काम पूर्ण झाल्यानतंरही नाईक यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळाले नव्हते. कामाचे पैसे मिळवण्यासाठी अन्वय यांनी सातत्याने अर्णव गोस्वामींसह इतरांना विनंती केली होती. मात्र अर्णव गोस्वामी, फिरोज शेख आणि नितेश सरडा त्यांना पैसे देण्यास टाळाटाळ करत होते.
संबंधित बातम्या :
अन्वय नाईकप्रकरण आधीच्या सरकारने दाबलं; जयंत पाटलांचा आरोप
अन्वय नाईक आत्महत्येची चौकशी क्लोज करणाऱ्यांची चौकशी व्हावी: अरविंद सावंत