नवी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, पालिकेकडून युद्ध पातळीवर तयारी
नवी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे (Second wave of Corona in Navi Mumbai).
नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता पालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे (Second wave of Corona in Navi Mumbai). गेल्या आठवडाभरात 400 च्या आत कोरोनाबाधित रुग्णाची संख्या आढळून येणाऱ्या पालिका क्षेत्रात मागील केवळ एका आठवड्यात दिवसाला 260 ते 390 इतकी रुग्णसंख्या आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.
एकिकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून प्राणवायूचाही तुटवडा भासत असल्याची तक्रार रुग्णांच्या नातेवाईकांकडून केली जात आहे. मात्र, दुसरीकडे नवी मुंबईत 6 महिने पुरेल इतका प्राणवायूचा साठा असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबईत द्रवरुप प्राणवायू प्रकल्प उभारणार असल्याची माहिती दिली आहे.
नवी मुंबईतील कोरोनाबधितांची संख्या 30 हजारावर जाऊन पोहचली आहे. पालिकेकडून बेड्ससह अतिदक्षता कक्षाची युद्ध पातळीवर व्यवस्था करण्यात येत आहे. पालिकेकडे 3 हजार 309 साध्या खाटा, 335 आयसीयू खाटा, 2226 प्राणवायू खाटा तर 135 कृत्रिम श्वसन यंत्रणा आहेत. पालिकेकडून कोरोनाच्या चाचण्यांतही वाढ केली असल्याची माहिती देण्यात येत आहे. आतापर्यंत 1 लाख 6 हजार जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यात 62 हजार 622 आरटीपीसीआर चाचण्यांचा समावेश आहे.
विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करा : आमदार गणेश नाईक
“सध्या सर्व ठिकाणी अनलॉक 4 सुरु आहे. यात सगळीकडे मॉल, दुकाने सकाळी 7 ते रात्री 9 वाजेपर्यंत सामान्य नागरिकांसाठी खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे नागरिक बऱ्याच ठिकाणी विना मास्क फिरताना दिसत आहेत. तसेच सार्वजनिक ठिकाणी दुकानांमध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन करतानाही दिसत नाहीत. त्यामुळे भारतात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर भारत हा जगामध्ये कोरोना रुग्ण असलेला पहिल्या क्रमांकाचा देश बनू शकतो.” अशी भीती आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली.
ज्या प्रकारे ठाणे महानगर पालिकेने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर 500 रुपये दंड वसूल करण्यास सुरुवात केली आहे, त्यानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाई करावी. विना मास्क आणि बेजबाबदारपणे फिरणाऱ्या नागरिकांकडून 1000 रुपये दंड वसूल करावा, अशी मागणी गणेश नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली.
हेही वाचा :
एपीएमसीतील मापाडी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही, 4 कोटी 24 लाखांची थकबाकी
व्हिडीओ पाहा :
Second wave of Corona in Navi Mumbai