मुंबई बोट दुर्घटना: कुठे आईचे मायेचे छत्र हरपले तर कुठे वडील मुलांना पोरके करुन गेले…
घारापुरी येथील बेट पाहायला निघालेल्या 'नीलकमल' या प्रवासी फेरी बोटीला नेव्हीच्या स्पीड बोटने धडक दिल्याने १३ हून अधिक जणांचा बळी गेला आहे. या दुर्घटनेत अनेकांच्या घरातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्याने कुटुंबे वाऱ्यावर आली आहेत. नेरुळ प्रज्ञा कांबळे आणि बदलापूर येथील मंगेश केळशीकर यांचे कुटुंबही उघड्यावर पडले आहे.
गेटवे येथून घारापुरी येथील बेट पाहाण्यासाठी गेलेल्या ‘नीलकमल’ या बोटीच्या दुर्घटनेत १३ हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नेव्हीच्या तीन कर्मचाऱ्यांसह १३ जणांचा बळी गेले आहेत. एलिफंटाची सैर करायला निघालेल्यांना भर समुद्रात असे काही होईल याची कल्पना कोणालाच नव्हती. मुंबई दर्शन करायला आलेल्या पर्यटकांचाही या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. नेरुळ येथील प्रज्ञा कांबळे यांचा या दुर्घटनेत बळी गेला आहे. नेरुळ येथील रहिवासी प्रज्ञा कांबळे यांच्या पार्थिवावर गुरुवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या अकाली मृत्यूने त्यांच्या दोन मुलांचा मातृछत्र हरपले असून आईविना ही मुले पोरकी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
एलिफंटा येथे जाताना ‘नीलकमल’बोट बुडाल्याने तेरा जणांचा बळी गेला आहे. सरकारने या मृतांच्या वारसदारांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.. परंतू गेलेले जीव काही परत येणार नाहीत. नेरुळ येथील रहिवासी असलेल्या प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबावर आभाळच कोसळले आहे. प्रज्ञा यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. दोघांचे शिक्षण सुरु आहे. प्रज्ञा कांबळे या मिळेल ती नोकरी करुन आपल्या मुलांना वाढवत होत्या. त्यांची एक नोकरी दोनच महिन्यांपूर्वी गेली होती. त्या दुसऱ्या नोकरीच्या शोधात होत्या असे त्यांचा मावसभाऊ किरण निकम यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले आहे.
घटनेनंतर यंत्रणेला जाग येते…
प्रज्ञा यांच्या मृत्यू झाल्याने हे कुटुंब अजूनही धक्क्यातून सावलेले नाही असे तिचे मावस भाऊ किरण निकम यांनी सांगितले. आपली बहिण मिळेल ती खासगी नोकरी करीत कुटुंबाचे पोषण करीत होत्या. त्यांचा मुलगा बारावी शिकत आहे. शासनाने त्यांची मदत जाहीर केलेली आहे. परंतू घटना घडल्यानंतर सर्व जागे होतात असे ते म्हणाले. मुलांची आई निघून गेली आहे. आमचे एकत्र कुटुंब आहे. सर्वच जण मदत करीत होतो. परंतू घटना घडल्यानंतर जागे होण्यापेक्षा होऊ नये याची काळजी घेतली पाहीजे. बोटीत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी होते. याच्यावर कोण लक्ष ठेवणार ? प्रवाशांना लाईफ जॅकेट न पुरविणे, नौदलाच्या नवीन स्पीड बोटची चाचणी प्रवासी बोटीची रहादारी असणाऱ्या मार्गावर चालवणे हे चुकीचे असून प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबियांनी केली आहे.
एलीफंटा बोट दुर्घेटनेत नेरूळ मधील प्रज्ञा कांबळे यांचा दुर्देवी मृत्यू झालाय. त्यांच्यावर नेरूळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रज्ञा कांबळे यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून दोघेही शिक्षण घेत आहेत. प्रज्ञा कांबळे या मिळेल ती नोकरी करुन आपल्या दोन मुलांचे शिक्षण करत घर चालवत होत्या. मात्र आता त्यांचा मृत्यू झाल्याने दोन मुलांना आईचे प्रेम गमवावे लागलेय. घटना घडण्याआधी योग्य टी काळजी घेणे आवश्यक होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी भरणे, प्रवाशांना लाईफ जॅकेट न देणे तसेच नौदलाच्या नविन स्पीड बोटची चाचणी रहदारी असलेल्या प्रवाशी बोटीच्या मार्गात करणे हे चुकीचे असून प्रशासनाने दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी प्रज्ञा कांबळे यांच्या कुटुंबियांनी केलेय.
स्पीड बोटीच्या इंजिनिअरचे निधन
या भयंकर दुर्घटनेत बदलापूर येथील रहिवासी आणि नेव्हीतील मॅकनिकल इंजिनिअर मंगेश केळशीकर यांचाही मृत्यू झाला आहे. मंगेश हे स्पीड बोटचे टेस्टींग सुरु असताना नियंत्रण सुटल्याने बोटीवर बोट आदळून मृत्यूमुखी पावले. त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या केळशीकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात वृद्ध आई,पत्नी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. त्यांची पत्नी तीन महिन्यांची गर्भवती आहे. त्यांच्या कुटुंबाचा मंगेश हेच एकमेव कमवते आणि आधार होते. त्यांच्या जाण्याने केळशीकर कुटुंबाचा आधार नाहीसा झाला आहे.शासनाने तसच सामाजिक संस्थांनी केळशीकर कुटुंबाला आर्थिक मदत करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.