सांगलीतील महापुरामुळे कैदी कारागृहात अडकले, शाळेत स्थलांतर करताना दोघे पळाले
सांगलीतील कारागृहात महापुराचं पाणी शिरल्यामुळे त्यांचं शाळेत स्थलांतर करण्यात येत आहे. यावेळी दोघा कैद्यांनी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.
सांगली : कोल्हापूर, सांगलीसह राज्याच्या बऱ्याचशा भागात महापुराच्या पाण्याचं थैमान (Sangli Flood) पाहायला मिळत आहे. सांगलीमधील कारागृहात पाणी शिरल्यामुळे तब्बल 390 कैदी अडकले होते. कैद्यांना आता दुसरीकडे हलवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
सांगलीच्या कारागृहात महापुराचं पाणी शिरल्यामुळे एकच हाहाःकार उडाला. विविध गुन्ह्यांखाली सांगलीतील कारागृहात शिक्षा भोगत असलेले 390 कैदी कारागृहात अडकले. पाणी पातळी वाढू लागल्यानंतर कैद्यांच्या स्थलांतरासाठी तुरुंगाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे बोटी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली होती.
तुरुंगाच्या जवळ असलेल्या पटवर्धन हायस्कूलमध्ये आता या कैद्यांची रवानगी करण्याची तयारी सुरु आहे.
विशेष म्हणजे, महापुराच्या पाण्यात अडकल्याचा फायदा घेत दोघा कैद्यांनी कारागृहातून पळ काढला. दोघांपैकी एका कैद्याला पोलिसांनी पकडलं असून दुसऱ्याचा शोध आहे.
कृष्णा नदीच्या पाणीपातळीत अजूनही वाढ होत आहे. सांगलीतील आयुर्विन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणीपातळी 56 फूट 8 इंचावर गेली आहे.
सांगली जिल्ह्यातील 70 हजार नागरिक आणि 21 हजार जनावरं स्थलांतरित करण्यात आली आहेत. 21 हजार 500 हेक्टर शेती पुराच्या पाण्याखाली आहे. भारतीय सैन्य आणि एनडीआरएफच्या टीमकडून अजूनही बचावकार्य सुरुच आहे. एनडीआरएफच्या आणखी दोन टीम आणि कोस्टगार्डच्या दोन टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. गरज भासल्यास जिल्ह्यासाठी हेलिकॉप्टरची मागणी करण्यात येणार आहे.