इम्रान खान यांच्या नेत्याने पत्रकाराला लाईव्ह शोमध्ये धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानमधील टीव्ही चॅनलमध्ये चर्चा ही फक्त शाब्दिक राहिली नसून ती आता हाणामारीपर्यंत पोहोचली आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनलमधील एका चर्चासत्रात सत्ताधारी पक्ष पीटीआयच्या एका नेत्याने पत्रकारालाच मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
इस्लामाबाद : आर्थिक संकट आणि दहशतवादाच्या बातम्यांमुळे चर्चेत असलेलं पाकिस्तान पुन्हा एकदा चर्चेत आहे. पण यावेळचं कारण पाहिलं तर हसू आवरणार नाही. पाकिस्तानमधील टीव्ही चॅनलमध्ये चर्चा ही फक्त शाब्दिक राहिली नसून ती आता हाणामारीपर्यंत पोहोचली आहे. पाकिस्तानी न्यूज चॅनलमधील एका चर्चासत्रात सत्ताधारी पक्ष पीटीआयच्या एका नेत्याने पत्रकारालाच मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
पीटीआय हा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा पक्ष आहे. पीटीआयचे नेते मंसूर अली सियाल यांना एका चर्चासत्रासाठी बोलावण्यात आलं होतं. त्यांच्यासोबत चर्चेला कराची प्रेस क्लबचे अध्यक्ष इम्तियाज खानही होते. चर्चा सुरु असतानाच दोघे हमरीतुमरीवर आले आणि इम्तियाज खान यांनी धक्का देऊन खुर्चीवरुन खाली पाडलं. इम्तियाज खान यांनीही प्रतिकार केला, ज्यानंतर दोघांमध्ये तुफान हाणामारी झाली.
Is this Naya Pakistan? PTI's Masroor Ali Siyal attacks president Karachi press club Imtiaz Khan on live news show. pic.twitter.com/J0wPOlqJTt
— Naila Inayat नायला इनायत (@nailainayat) June 24, 2019
स्टुडीओमध्ये उपस्थित असलेल्या टीव्ही चॅनल स्टाफने दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. इम्तियाज खान यांना दुसऱ्या ठिकाणी नेताना मंसूर अली यांनी “तू मला ओळखत नाहीस” अशा शब्दात धमकी दिली. यानंतर दोघांनाही शांत करण्यात आलं आणि पुन्हा चर्चा सुरु करण्यात आली.