Pulwama Attack: माझा शब्द आहे, रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ : मोदी
Pulwama Attack नवी दिल्ली: मी देशाला शब्द देतो, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना त्यांची शिक्षा नक्कीच मिळेल, जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ,अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिली. हल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावीच लागेल. पुलवामा हल्ल्यामागे जी शक्ती आहे, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळणारच, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. प्रत्येक […]
Pulwama Attack नवी दिल्ली: मी देशाला शब्द देतो, त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना त्यांची शिक्षा नक्कीच मिळेल, जवानांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेऊ,अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना दिली. हल्लेखोरांना मोठी किंमत चुकवावीच लागेल. पुलवामा हल्ल्यामागे जी शक्ती आहे, त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळणारच, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्रत्येक भारतीय नागरिक जवानांच्या सोबत आहे. संपूर्ण देश एकजूट होऊन या आव्हानाचा सामना करत आहे. ही वेळ आमच्यासाठी संवेदनशील आहे. मात्र प्रत्येक हल्ल्याला आम्ही चोख प्रत्युत्तर देऊ, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावून सांगितलं.
दहशतवादी संघटना आणि त्यांना मदत करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असं मोदी म्हणाले.
जे जवान शहीद झाले आहेत, त्यांना मी वंदन करतो. आमच्या सुरक्षा यंत्रणांना संपूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आम्हाला त्यांच्या शौर्यावर विश्वास आहे, असं मोदी म्हणाले.
Prime Minister Narendra Modi: I pay tribute to soldiers who lost their lives in #PulwamaAttack. Our security forces have been given full freedom. We have full faith in their bravery. pic.twitter.com/kXtK3GyV70
— ANI (@ANI) February 15, 2019
याशिवाय पंतप्रधान मोदींनी जेवढा तुम्ही विध्वंस कराल, त्याला आम्ही विकासाने उत्तर देऊ असंही यावेळी सांगितलं.
“मी पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहतो. या जवानांनी देशासाठी आपलं बलिदान दिलं. दु:खाच्या या प्रसंगी संपूर्ण देश या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहे. या हल्ल्यामुळे देशात जो आक्रोश आहे, जनतेचं रक्त खवळत आहे, मी ते समजू शकतो. या क्षणी देशातील जनतेची बदल्याची भावना आहे, ती स्वाभाविक आहे. आमच्या सुरक्षा दलांना पूर्ण स्वातंत्र्य दिलं आहे. आम्हाला आमच्या सैनिकांच्या शौर्यावर पूर्ण विश्वास आहे”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
दहशतवादी संघटना आणि त्यांच्या आकांना मी सांगू इच्छितो, तुम्ही खूप मोठी चूक केली आहे, असा इशारा मोदींनी दिला.
मी देशाला विश्वास देऊ इच्छितो की या हल्ल्यामागे ज्या कोणी शक्ती आहेत, जे कोणी गुन्हेगार आहेत, त्यांना त्यांची शिक्षा मिळणारच, असं मोदी म्हणाले.
ही सर्वात संवेदनशील आणि भावनिक वेळ आहे, त्यामुळे राजकारण विसरुन एकत्र या, असं आवाहन मोदींनी केलं. सध्या देश एकजूट होऊन या परिस्थितीचा सामना करत आहे, हा आवाज जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचायला हवा, असं मोदी म्हणाले.
संपूर्ण जगात एकाकी पडलेला आमचा शेजारील देश अशी घृणास्पद कृत्ये करुन, भारतात अस्थिरता निर्माण करु पाहात असेल, तर ते खूप मोठी चूक करत आहेत, असा सज्जड दम मोदींनी दिला.
पुलवामात हल्ला
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे जवळपास 37 जवान शहीद झाले आहेत, तर 38 जवान जखमी आहेत. जखमी जवानांवर जम्मूतील बदामीबागच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नेमकं काय घडलं?
दहशतवाद्यांनी हायवेवर उभ्या असलेल्या एका गाडीमध्ये आयईडी स्फोट केला आणि त्यानंतर सीआरपीएफच्या ताफ्यावर फायरिंग सुरु केली. सीआरपीएफच्या वाहनामध्येही आयईडी ब्लास्ट करण्यात आल्याची माहिती आहे. काही जवान जागेवरच शहीद झाले, तर काही जवानांना उपचारासाठी नेताना ते शहीद झाले. ज्या ताफ्यावर हल्ला झाला, त्या ताफ्यामध्ये अडीच हजार जवान असल्याची माहिती आहे.
पुलवामा हल्ल्याचा जगभरातून तीव्र निषेध
या हल्ल्याविरोधात अनेक देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे. जगभरातून या हल्ल्याचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात येत आहे. रशिया, भूतान, अमेरिका, अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, इस्रायलसह जगभरातील अनेक देशांनी भारतीय जवानांवर झालेल्या या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे. या हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात आता एकत्र येण्याची वेळ आहे, दहशतवादाला जगात स्थान नाही, दहशतवाद पूर्णपणे संपायला हवा अशा तीव्र प्रतिक्रिया जगभरातून येत आहेत.
संबंधित बातम्या
Pulwama Attack : मास्टरमाईंड आदिल अहमद दार नेमका कोण?
गेल्या पाच वर्षातले आतापर्यंतचे मोठे दहशतवादी हल्ले
Pulwama Attack : पाकची 9 तासांनंतर प्रतिक्रिया, इम्रान खान अजूनही चिडीचुप