शिवतारेची एवढी औकातच नाही की तो एवढा…; अजित पवारांच्या शिलेदाराचा थेट आरोप
NCP Ajit Pawar Group Leader Amol Mitkari on Vijay Shivtare : अजित पवारांचा शिलेदाराचा मैदानात; विजय शिवतारे यांच्यावर गंभीर आरोप... बारामतीतून लढण्याचा शिवतारे यांनी निर्धार केला आहे. त्यांच्यावर अजित पवार गटाकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. वाचा सविस्तर...
काहीही झालं तरी बारामती लोकसभा लढणार आणि जिंकणारच…, असा निर्धार शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी ते मतदारसंघात लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांची युती असतानाही विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून विजय शिवतारे यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. अजित पवारांचे निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिवतारेंवर टीकास्त्र डागलं आहे.
शिवतारेंवर निशाणा
मला त्यांच्या तब्येतीची फार काळजी आहे… ते असं का वागत आहेत?. परिवारात वैफल्यग्रस्त असतो त्यावेळेस अशा प्रकारचे विधान होत असतात. त्यांनी निवडणूक लढवावी यावेळेस त्यांचा डिपॉझिट ही वाचणार नाही. अजितदादांना बोलून त्यांना असुरी आनंद घ्यायचा असेल तर तो घ्यावा…, असं मिटकरी म्हणालेत.
विजय शिवतारेची एवढी अवकातच नाही की तो एवढा बोलेन… शिवतारेच्या मागचा मास्टरमाइंड दुसराच आहे. बारामती ज्यावेळेस आम्ही प्रचाराला जाऊ. त्यावेळेस तो मास्टरमाईंड कोण आहे हे जनतेसमोर आणू… काही गोष्टी गुलदस्तात ठेवा, असा इशाराच मिटकरींनी विजय शिवतारेंना दिला आहे.
शरद पवार गटावर टीका
बारामतीत सुनेत्रा पवारच त्या ठिकाणी उमेदवार असणार आहेत. पण तिथलं वातावरण डिस्टर्ब व्हावं म्हणून आमच्यातलाच एक गट जो आहे तो अशा प्रकारच्या कंड्या पेरतोय. आमच्यातला गट म्हणजे तुतारी गट…, असं अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर जोरदार टीका केली आहे.आता घरातले सगळे संपले आता…वॉचमन, गेट किपर, गाय वासरू कुक हे सगळेच स्क्रीप्ट घेऊन आणतील… कितीही चक्रव्यूह आखला तरी बारामतीचा नागरिक अजित पवारांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या जागावाटपावर म्हणाले…
लोकसभेच्या किती जागा मिळतील? आणि कुणाकुणावर जबाबदारी दिली जाईल? हे बैठकीनंतरच समजेल. सातही मतदारसंघावर आमचा दावा कायम आहे. महादेव जानकर बारामतीतून लढणार या चर्चेला काही अर्थ नाही. परभणीतून ते लढतील असं त्यांनी सांगितलं आहे. महादेव जानकर बारामतीमधून लढणार या सगळ्या कपोकल्पित चर्चा आहेत, असं म्हणत राजकीय वर्तुळातील चर्चांवर मिटकरींनी भाष्य केलंय.