दरोडे जोग यांच्याविरोधात गुन्हा, डीएसकेंनंतर पुण्यात आणखी एका बड्या बिल्डरभोवती कारवाईचा फास
गुंतवणूकदारांच्या फसवणुकीप्रकरणी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दरोडे जोग यांच्याविरोधात पुण्यातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला

पुणे : डीएसके अर्थात डी. एस. कुलकर्णींनंतर पुण्यातील आणखी एका बिल्डरभोवती कारवाईचा फास आवळला जाण्याची चिन्हं आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दरोडे जोग यांच्याविरोधात पुण्यातील मार्केटयार्ड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा (Builder Darode Jog Booked) दाखल करण्यात आला आहे. हित संरक्षण (एमपीआयडी) कायद्याअंतर्गत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
निशा चेतन बाफना आणि त्यांचे चुलत सासरे सतीश बालाजी बाफना हे दोघे बिल्डर दरोडे जोग यांच्याविरोधात न्यायालयात गेले होते. न्यायालयाने गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात सुधीर दरोडे, आनंद जोग आणि दरोडे जोग अँड असोसिएट्स या फर्मविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
निशा आणि सतीश बाफना यांनी एका बिझनेस प्लॅनमध्ये पैसे गुंतवले होते, मात्र ते पैसे परत न मिळाल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. निशा बाफना यांनी 22 लाख, तर सतीश बाफना यांनी 44 लाख गुंतवणूक केली होती. त्यांना काही परतावा मिळाला होता, तर काही रक्कम मिळाली नाही.
खडसेंच्या अडचणी वाढण्याची चिन्हं, भोसरी जमीन खरेदी प्रकरणाने पुन्हा मान वर काढली!
फडणीस प्रॉपर्टीज आणि डी एस कुलकर्णी डेव्हलपर्सनंतर गुंतवणूकदारांच्या हिताचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल झालेले ते पुण्यातील तिसरे प्रमुख बांधकाम व्यावसायिक ठरले आहेत.
मार्च 2017 पर्यंत गुंतवणूकदारांना ठेवींवर व्यवस्थित व्याज मिळत होतं. मात्र त्यानंतर दरोडे जोग यांनी अचानक ठेवीवरील व्याज देणं थांबवल्याचा आरोप शेकडो गुंतवणूकदारांनी केला आहे. व्याज आणि परिपक्वतेच्या मुदत ठेवींच्या रकमेची परतफेड करण्यासाठी दिलेले धनादेश खात्यात पैसे नसल्याने बाऊन्स होऊ लागले. त्यासंदर्भात दरोडे जोगच्या ऑफिसला फोन, पत्रं आणि वैयक्तिक भेट देऊनही गुंतवणूकदारांना कोणताही प्रतिसाद मिळेनासा (Builder Darode Jog Booked) झाला.