पुणे जिल्ह्यातील ‘या’ सहा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही

पुणे जिल्ह्यातील इंदापूर, मावळ, दौंड, खेड, पुरंदर आणि आंबेगाव या सहा तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. (Pune District Six Talukas with No Corona Patient)

पुणे जिल्ह्यातील या सहा तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नाही
| Updated on: Apr 17, 2020 | 11:10 AM

पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव निम्म्या पुणे जिल्ह्यात झाल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 7 तालुक्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत, तर सहा तालुक्यात ‘कोरोना’चा एकही रुग्ण सापडलेला नाही. (Pune District Six Talukas with No Corona Patient)

राज्यातील पहिला रुग्ण पुणे शहरात 9 मार्चला सापडला होता. त्यानंतर 10 मार्चला पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील हवेली तालुक्यातील मांजरी येथे रुग्ण सापडला.

आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील हवेली, शिरुर, बारामती, भोर, वेल्हे, मुळशी आणि जुन्नर या सात तालुक्यात कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर उर्वरित इंदापूर, मावळ, दौंड, खेड, पुरंदर आणि आंबेगाव या सहा तालुक्यात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे ग्रामीण भागात अधिक काळजी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. भोर आणि पुरंदर या दोन तालुक्यात ‘बारामती पॅटर्न’ राबवायला सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्रात आतापर्यंत 7 पोलीस अधिकारी आणि 16 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पुण्यातला आणखी काही भाग सील करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ‘कोरोना’चा संसर्ग वाढत असल्यामुळे अजून काही भाग सील करण्याची महापालिकेची तयारी आहे. पुणे शहराचा पूर्व भाग म्हणजे नगर रोड, हडपसर, कात्रज, धनकवडीतील काही भाग सील होण्याची शक्यता आहे. परिसर निश्चित झाला असून पोलिसांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. त्यामुळे शहरातील संचारबंदी आणखी कडक होणार आहे. (Pune District Six Talukas with No Corona Patient)

हेही वाचा : पुण्यात कर्फ्यूच्या व्याप्तीत वाढ, 28 नवीन भागात संचारबंदी, कुठे-कुठे कर्फ्यू लागू?

दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यूदर अद्यापही सर्वाधिक आहे. राज्यातील मृत्यूदर 6.41 टक्के आहे, परंतु पुण्यातील ‘कोरोना’ग्रस्तांचा मृत्यूदर दहा टक्क्यांच्या आसपास आहे. राज्यातील सर्वाधिक ‘कोरोना’बळी मुंबईत गेले असले, तरी रुग्णसंख्येच्या तुलनेत अधिक मृत्यू पुण्यात आहेत.

पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात एका दिवसात 69 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने एकूण संख्या 506 वर गेली आहे, तर 47 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण पाहिल्यानंतर राज्यात सर्वाधिक म्हणजे 9.3 टक्के मृत्यूदर पुण्यात असल्याचं दिसून येतं.

ससून रुग्णालयात पुण्यातील सर्वाधिक म्हणजे 38 जणांचे मृत्यू झाले आहेत. अनेक कोरोनाबाधित रुग्णांना मधुमेह, उच्च रक्तदाब, इतर आजार किंवा शस्त्रक्रिया झाल्याचे पाहायला मिळाले आहे.