पुण्यात नवा गोल्डमॅन, सोन्याचे दागिने सोडा, चप्पल आणि बूटही सोन्याचा!

| Updated on: Jul 17, 2019 | 11:31 AM

मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे, दत्ता फुगे यांच्यानंतर आता पुण्यात आणखी एक गोल्डमॅन चर्चेत आला आहे.

पुण्यात नवा गोल्डमॅन, सोन्याचे दागिने सोडा, चप्पल आणि बूटही सोन्याचा!
Follow us on

पुणे : सोन्याचा मोह नाही, अशी व्यक्ती आपल्याला सापडणे कठीण आहे. अंगावर दागिने घालून मिरवण्याची हौस भारतात सर्वाधिक आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात सोन्याला भलताच मान आहे. पुण्यात तर अनेक किलो सोने घालणारे गोल्डमॅन पाहायला मिळतात. मनसेचे दिवंगत आमदार रमेश वांजळे, दत्ता फुगे यांच्यानंतर आता पुण्यात आणखी एक गोल्डमॅन चर्चेत आला आहे. प्रशांत सपकाळ असं या गोल्डमॅनचं नाव आहे.

प्रशांत सपकाळ हे तब्बल पाच किलो म्हणजेच दीड कोटीपेक्षा जास्त सोने अंगावर घालतात. त्यामुळे पुण्यातील नवा गोल्ड मॅन म्हणून प्रशांतची हवा झाली आहे. प्रशांत सपकाळ यांच्याकडे चेन, ब्रेसलेट, घड्याळ एव्हढंच नाही तर सोन्याची चप्पल आणि सोन्याचा बूटही आहे. सोन्याची चप्पल आणि सोन्याच्या शूजवर तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे.

प्रशांत सपकाळ यांना लहानपणापासूनच सोन्याच्या दागिन्यांची आवड होती. मात्र प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांना पाहिल्यानंतर त्यांची आवड आणखीनच वाढली. त्यातूनच पुण्यात नवा गोल्डमॅन उदयाला आला. दिवंगत मनसे आमदार रमेश वांजळे आणि दत्ता फुगे यांच्यानंतर आता सुरेश सपकाळ यांची हवा आहे.

प्रशांत सपकाळ व्यवसायाने बिल्डर आहेत. बांधकाम व्यवसायातूनच आपली भरभराट झाल्याचं ते सांगतात. प्रशांतराव दाग-दागिन्यांनी अक्षरश: मढून गेलेत. पाच चेन, पेंडेंट, लॉकेट, ब्रेसलेट, घड्याळ अनेक अंगठ्या, शूज त्यांच्या अंगावर दिसतात. तब्बल पाच किलोचे दागदागिने घालून ते सोनेरी झालेत.

सोन्याच्या दागिन्यांमुळे प्रशांत सपकाळ यांची पुण्यात चांगलीच हवा झाली आहे. प्रशांतरावांना आता वेगवेगळ्या कार्यक्रमांना आग्रहानं बोलावलं जातंय. जिथे जाईल तिथं सेल्फी आलीच. जो तो मागे वळून वळून त्यांच्याकडे कुतूहलानं पाहतो. आठ ते दहा बाउन्सरच्या गराड्यात प्रशांतराव असतात. गोल्डमॅनमुळे मिळत असलेल्या प्रसिद्धीने ते सुद्धा खुश आहे.

पुण्याचा गोल्डमॅन म्हणून प्रशांत सपकाळ यांना प्रसिद्धी मिळती आहे. संधी मिळाली तर राजकारणातही जाण्याचे त्यांचे मनसुबे आहेत.