पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून सीरम इन्स्टिट्यूटच्या कोरोना लसीचा आढावा, अनेक आजारांवरील लस निर्मितीमध्ये ‘सीरम’चं मोठं योगदान
अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणाऱ्या लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला.
पुणे: संपूर्ण जगासह भारतामध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. अशावेळी भारतात अहमदाबाद, हैदराबाद आणि पुण्यात कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून निर्माण केली जाणारी लस अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. या लसीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर आले आहेत.(Review of Corona Vaccine of Serum Institute by PM Narendra Modi)
अहमदाबादमधील झायडस कॅडिला, हैदराबादेतील भारत बायोटेक आणि पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये निर्मिती केली जाणाऱ्या लसीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. ऑक्सफर्ड विद्यापीठ, अॅस्ट्रा झेनेका आणि सीरम इन्स्टिट्यूटद्वारे संयुक्तरित्या कोरोना लसीची निर्मिती सुरु आहे. तर लसीच्या वितरणाबाबत केंद्र सरकारनं आतापासूनच मोठी तयारी सुरु केली आहे.
सिरम इन्स्टिट्यूट आणि लस निर्मितीचा इतिहास
सायरस पुनावाला यांनी पुण्यातील हडपसर भागात 1966 साली सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची स्थापना केली. सायरस पुनावाला यांना शर्यतीच्या घोड्यांमध्ये रस होता. घोड्यांच्या रक्ताचा उपयोग अनेक प्रकारच्या लस निर्मितीसाठी केला जातो. त्यातूनच सायरस पुनावाला यांनी लस निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आणि तिथून सीरम इन्स्टिट्यूटच्या प्रवासाला सुरुवात झाली.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही विविध आजारांवरील लस निर्माण करणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. सीरम इन्स्टिट्यूटकडून सध्या पोलिओ, डायरीया, हिपॅटायटस, स्वाईन फ्लू अशा अनेक आजारांवरील लसींची निर्मिती केली जाते. आज जगभरात वेगवेगळ्या आजारांवर ज्या लसींचा उपयोग केला जातो, त्यापैकी 65 टक्के लस या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार होतात. कोरोनावरील लस तयार करण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटचा ऑक्स्फर्ड युनिव्हर्सिटी आणि ॲस्ट्रा झेनेका यांच्या सोबत करार झाला आहे.
सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी कोरोनाची एक लस सरकारला अडीचशे रुपयांना दिली जाईल, असं जाहीर केलं आहे. तसंच एकूण लसीच्या 90 टक्के लस ही सुरुवातीला भारतीय नागरिकांना दिली जाईल, असंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.
‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’
‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’ अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींच्या पुणे दौऱ्यावर टीका केली आहे. एक लाख कोटींच्यावर गप्पा मारणारे आज पुण्यात आहेत. शेवटी पुण्यातच लस तयार होत आहे. ही लस पुणेकरांनी शोधली आहे नाहीतर कोणीतरी म्हणायचं मीच (स्वतःबाबत) शोधली अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी मोदींवर निशाणा साधला आहे. त्या पुण्यात आयोजित मेळाव्यामध्ये बोलत होत्या.
संबंधित बातम्या:
Good News! भारतात डिसेंबरपर्यंत सिरम इन्स्टिट्यूट कोरोना लसीचे 10 कोटी डोस पुरवणार
‘दुनिया घुम लो, हमारे पुणे के आगे कुछ नहीं’; सुप्रिया सुळेंची मोदींवर खोचक टीका
Review of Corona Vaccine of Serum Institute by PM Narendra Modi