स्वतःच्या मुलाचे पेपर मर्जीतल्या प्राध्यापकांकडून तपासले, उपकुलसचिवांवर गुन्हा
अहिल्याबाई होळकर विद्यापीठातील परीक्षा विभागात कार्यरत असलेल्या उपकुलसचिव अर्चना चोपडे-साळुंखे यांनी आपल्या अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या मुलाला उत्तीर्ण करण्यासाठी अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.
सोलापूर : नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत राहणारं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासन आता चक्क तिथल्या उपकुलसचिवांच्या गैरकारभारामुळे चर्चेत आलंय. आपल्या पदाचा गैरवापर करत मुलाला पास करण्यासाठी केलेल्या प्रयत्नाचा ठपका ठेवत अर्चना चोपडे-साळुंखे यांना निलंबित केलं होतं. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. यामध्ये विद्यापीठातील अनेकांचे हात अडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
अहिल्याबाई होळकर विद्यापीठातील परीक्षा विभागात कार्यरत असलेल्या उपकुलसचिव अर्चना चोपडे-साळुंखे यांनी आपल्या अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिकत असलेल्या मुलाला उत्तीर्ण करण्यासाठी अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. ही घटना फेब्रुवारीत उघड झाली. त्यानंतर निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समितीही नेमली. त्या समितीने दिलेल्या अहवालानुसार, गोपनीय कामकाज असतानाही चोपडे यांनी आपल्या मुलाच्या सर्व उत्तरपत्रिका स्वत:च्या अधिकारात ठेवल्या होत्या. काही उत्तरांचे पुनर्लेखन केले. उत्तरपत्रिकांवर खाडाखोड केली. दोन विषयात नॉट अटेस्टेड, दोन विषयात रिव्हॅल्युएशन आणि दोन विषयांत रिचेकिंग अशा सहाही विषयातील प्रक्रिया स्वत:च्या अधिकारात पूर्ण केली.
मर्जीतील प्राध्यापकाकडून उत्तरपत्रिका तपासत अनुत्तीर्ण मुलाला उत्तीर्ण करण्यासाठी प्रयत्न केल्याची बाब परीक्षा विभागातीलच काही कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने आता गुन्हा दाखल केलाय.
उपकुलसचिवांच्या या कारभाराबाबत प्रथम विद्यापीठ प्रशासनाने या गंभीर प्रकरणात मौन बाळगत माध्यमांपासून ही बाब गुप्त राखण्यात काही अंशी यशही मिळवलं. मात्र विद्यापीठ कर्मचाऱ्यांतील दबक्या आवाजातील चर्चेचं वृत्तांकन माध्यमातून झळकलं आणि प्रकरण समोर आलं. त्यामुळे जागे झालेल्या विद्यापीठ प्रशासनाने चोपडे यांना विद्यापीठाने एप्रिलमध्ये निलंबित केलं होतं. आता दोन महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय. तूर्तास अर्चना चोपडे -साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी आणखी त्यांना सहकार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.