विद्यार्थ्यांसाठी सर्वात चांगली शहरं, पहिल्या 100 मध्ये फक्त दोन भारतीय नावं
ग्लोबल कन्सल्टन्सी कंपनी क्वाकेरॅली सायमंड्सने भारतासह जगातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांची रँकिंग (QS best student cities 2019) जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात चांगलं शहर लंडन ठरलंय. तर पहिल्या 100 मध्ये बंगळुरु आणि मुंबई या दोन शहरांचा समावेश आहे.
मुंबई : विद्यार्थी कॉलेज निवडताना अगोदर कॅम्पस पाहतात. पण कॉलेज ज्या शहरात आहे, ते शहरच विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट असेल तर? ग्लोबल कन्सल्टन्सी कंपनी क्वाकेरॅली सायमंड्सने भारतासह जगातील विद्यार्थ्यांसाठी सर्वोत्कृष्ट शहरांची रँकिंग (QS best student cities 2019) जाहीर केली आहे. यामध्ये सर्वात चांगलं शहर लंडन ठरलंय. तर पहिल्या 100 मध्ये बंगळुरु आणि मुंबई या दोन शहरांचा समावेश आहे.
गेल्या वर्षीच्या यादीतही लंडनचाच पहिला क्रमांक होता. यावेळीही लंडनने आपलं स्थान कायम ठेवलंय. तर भारताच्या चार शहरांचा टॉप 120 स्टुडेंट फ्रेंडली शहरांमध्ये समावेश झालाय. यामध्ये बंगळुरु (81), मुंबई (85), दिल्ली (113) आणि चेन्नईचा (115) समावेश आहे.
जगभरातील टॉप 10 शहरं
लंडन (ब्रिटन)
टोकियो (जपान)
मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
म्युनिक (जर्मनी)
बर्लिन (जर्मनी)
मॉन्ट्रीयल (कॅनडा)
पॅरिस (फ्रान्स)
ज्युरिक (स्वित्झर्लंड)
सिडनी (ऑस्ट्रेलिया)
सियोल (द. कोरिया)
क्यूएसच्या टॉप 120 शहरांमध्ये अमेरिका आणि ब्रिटनचे प्रत्येकी 14-14 शहरं आहेत. तर ऑस्ट्रेलियाच्या सात शहरांचा समावेश आहे. आशिया खंडातून जपानमधील टोकियो, दक्षिण कोरियाची राजधानी सियोल टॉप 10 मध्ये आहे, तर हाँगकाँग 14 व्या, चीनची राजधानी बीजिंग 32 व्या आणि शांघाय 33 व्या क्रमांकावर आहे.
रँकिंग कशाच्या आधारावर ठरली?
शहरातील विद्यापीठांची संख्या, शैक्षणिक कामगिरी, रोजगाराच्या संधी, शहरातील राहणीमानाची गुणवत्ता आणि अनुकूलता या सर्वांच्या आधारावर क्यूएस रँकिंग ठरवली जाते. क्यूएसने हे विश्लेषण करण्यासाठी जगभरातील 87 हजार विद्यार्थी-विद्यार्थीनींची प्रतिक्रिया जाणून घेतली.
विद्यार्थ्यांच्या आवडीची शहरं आमची रँकिंग दाखवते, विशेषतः आंतरराष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थी, अशी प्रतिक्रिया क्यूएस रिसर्च डायरेक्टर बेन सोटर यांनी दिली. भारताची प्राथमिकता सध्या देशांतर्गत विकास आणि उच्च शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना आणणं यापर्यंतच आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या मापदंडांमध्ये भारताला कमी गुण मिळाले, असंही बेन सोटर यांनी सांगितलं.