गॉगल लावून मदतीचे फोटो काढणं योग्य आहे का? राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचे कान टोचले
आपण ज्याला मदत करत आहोत, त्याचा चेहरा दाखवून त्याला लाजवत नाही का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. (Raj Thackeray questions Photo session of Corona pandemic help)
मुंबई : ‘आपण ज्याला मदत करत आहोत, त्याचा चेहरा दाखवून त्याला लाजवत नाही का? गॉगल लावून स्वत:सह मदत स्वीकारणाऱ्यांचे फोटो काढणं योग्य आहे का?’ असे प्रश्न विचारात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांसह सर्वांचे कान टोचले आहेत. ‘कोरोना’ साथीच्या पार्श्वभूमीवर गरजूंना दिल्या जात असलेल्या मदतीचं फोटोसेशन करण्यावरुन राज ठाकरेंनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Raj Thackeray questions Photo session of Corona pandemic help)
‘काही मोजके जण कॅमेराकडे बघून मदतकार्याची छायाचित्र काढणे, ज्याला मदत दिली जात आहे, त्याला कॅमेरामध्ये बघायला सांगणे किंवा गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्र काढणे असे चुकीचे प्रकार करत आहेत’ असं राज ठाकरे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
‘आपण ज्याला मदत करत आहोत, त्याचा चेहरा दाखवून त्याला लाजवत नाही का? प्रत्येक माणूस हा मुळात स्वाभिमानी असतो. शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं. पण आज प्रसंगच बाका आहे. त्यामुळे नाईलाजाने त्याला मदत स्वीकारावी लागत आहे. अशावेळी त्यांचे फोटो काढून त्यांची मान शरमेने खाली घालणं कितपत योग्य आहे? मदतकर्त्याने कॅमेरामध्ये बघत फोटो काढणं योग्य आहे का?’ असा अंतर्मुख करणारा सवाल राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांसह सर्वांना विचारला आहे.
हेही वाचा : उपचार काय करताय, मरकजवाल्यांना गोळ्या घाला : राज ठाकरे
‘फक्त महाराष्ट्र सैनिकच नाही, तर सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मनापासून मेहनत घेत आहेत. मदतीला धावून जात आहेत’ त्यांचंही राज ठाकरे यांनी अभिनंदन केलं. महाराष्ट्राची परंपरा निरपेक्ष सेवेची आहे. त्या परंपरेचं दर्शन आपण पुन्हा एकदा घडवूया’ असं त्यांनी म्हटलं आहे.
‘यापुढे मनसेच्या ईमेल आयडीवर मदतीची छायाचित्र पाठवली जाणार असतील, तर मदतीचं प्रमाण, साहित्य आणि संपर्कस्थळ याची पाठवा’ असं राज ठाकरेंनी बजावलं आहे. घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझर सोबत ठेवा आणि प्रशासनाला विश्वासात घेऊन काम करा’ अशा सूचना राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
#आवाहन #कोरोना pic.twitter.com/PbGEBURj9F
— Raj Thackeray (@RajThackeray) April 14, 2020
(Raj Thackeray questions Photo session of Corona pandemic help)