ठाकरे गटाच्या खासदाराच्या जीवाला धोका?; खासदार म्हणाला, माझ्या जीवाला काही झाले तर…
मी स्वत: एक लोकप्रतिनिधी असून जनतेमध्ये आम्हाला जावे लागते. या अशा वाढत्या गुन्हेगारीमुळे माझी सुरक्षा धोक्यात आली आहे. माझ्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सुरक्षा रक्षकही कमी केले आहेत. त्यामुळे माझ्या जीवाचे काही झाल्यास त्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार राहतील ' असे पत्र
ठाणे | 13 फेब्रुवारी 2024 : राज्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले असून भीतीखाली जीवन जगत आहेत. मात्र आता फक्त सामान्यांनाच नव्हे तर राजकारण्यांनाही त्यांच्या जीवाची भीती वाटू लागली आहे. ‘ मी स्वत: एक लोकप्रतिनिधी असून जनतेमध्ये आम्हाला जावे लागते. या अशा वाढत्या गुन्हेगारीमुळे माझी सुरक्षा धोक्यात आली आहे. माझ्या सुरक्षिततेसाठी नेमलेले सुरक्षा रक्षकही कमी केले आहेत. त्यामुळे माझ्या जीवाचे काही झाल्यास त्यास मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबाबदार राहतील ‘ असे पत्र ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना लिहीले आहे. सोमवारी त्यांनी हे पत्र ठाणे पोलिसांना दिले. ठाण्यातील गुन्हेगारांची परेड घेण्याची मागणी देखील त्यांनी केली.
खासदार राजन विचारे हे ठाणे लोकसभेचे खासदार आहेत. तसेच ते ठाकरे गटाचे नेते आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांना हे पत्र लिहीले. सोमवारी संध्याकाळी ते डुंबरे यांची भेट घेण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये गेले, मात्र तेथे डुंबरे यांची भेट न झाल्याने त्यांनी हे पत्र सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांना दिले.
ठाण्यातील वाढती गुन्हेगारी ताबडतोब रोखा
पुण्याप्रमाणे ठाण्यातही मोकाट असलेल्या गुंडांची परेड घ्या अशा आशयाचे निवेदन देत ठाकरे गटाचे राजन विचारे यांनी ठाणे पोलिस मुख्यालयात मागणी केली. ठाणे शहरात वाढत्या गुन्हेगारी बाबत ठाणे पोलिसांनी धडक कारवाई करावी .गणपत गायकवाड आणि घोसाळकर गोळीबार प्रकरणात देखील पोलिसांनी योग्य अशी कडक कारवाई करावी. यासाठी उद्धव ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने ठाण्याचे पोलीस सह आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण यांची भेट घेऊन मागणी केली.
गेल्या काही दिवसांत राज्यात गुन्ह्यांच्या थरकाप उडवणाऱ्या घटना घडल्या. ठाणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असून घटनाबाह्य सरकारकडून गुन्हेगारीला चालना मिळते का असे वाटू लागले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातही गुन्हे राजेरोसपणे सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच उल्हासनगरमध्ये भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यातच गोळीबार केला. त्यानंतर दहिसर येथे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर फेसबूक लाईव्ह दरम्यान गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यासह राज्यभरात कुठे ना कुठे असे गुन्हे घडतच असून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येते. या मुद्यावरून विरोधकांनीही सरकारला धारेवर धरले. याच मुद्यावरून खासदार राजन विचारे यांनी हे पत्र लिहीले आहे.