राजकीय महत्वाकांक्षा ते बलात्काराचा गुन्हा, कोण आहे भावेश भिंडे ? गुज्जू ॲड एजन्सीही काढली होती
Ego Media Pvt Ltd. या जाहिरात कंपनीस 10 वर्षांच्या भाडेतत्वावर हा जाहिरात फलक उभारण्यास तत्कालीन लोहमार्ग पोलीस आयुक्त कैसर खलीद यांनी परवानगी दिल्याचे उघडकीस आले होते. BPCL या कंपनीचा पेट्रोल पंप घाटकोपर येथील पोलीसांच्या मालकीच्या जागेत 10 डिसेंबर 2021 पासून सुरु असल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबईच्या पूर्व उपनगरातील घाटकोपरच्या छेडा नगरात कालच्या वादळी पावसात कोसळलेल्या भल्या मोठ्या होर्डींग्ज खाली सापडून 14 जणांचा मृत्यू तर 74 जण जखमी झाले आहेत. या होर्डींग्जला परवानगी कोणी दिली यावरुन एकीकडे राजकीय चिखलफेक सुरु असताना आता या वादग्रस्त आणि शापित होर्डिंग्जच्या जाहिरात कंपनीचा मालक भावेश भिंडे याच्या अनेक भानगडी बाहेर येत आहेत. भावेश भिंडे याने विधानसभा निवडणूक देखील लढविली होती. तसेच त्याच्यावर बलात्कारासह तब्बल 23 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले होते. भावेश हा घटनेनंतर फरार झाला होता. त्याचे लोकेशन लोणावळापर्यंत दाखवित होते. त्याला अखेर मुंबईच्या गुन्हे शाखेने उदयपूर येथून गुरुवारी अटक केली आहे.
मुंबईत काल वळीवाचा पाऊस झाला. यावेळी सोसाट्याच्या वारा सुटल्याने त्याच्या वेगाने मुंबईतील वडाला येथे 14 मजली वाहनांची लिफ्टची परात कोसळून वाहनांचा चक्काचूर झाला. तर त्याचवेळी दुपारी साडे चारच्या सुमारास वेस्टर्न एक्स्प्रेस जवळील घाटकोपरच्या छेडा नगरातील भलेमोठे होर्डींग्ज लोहमार्ग पोलिसांच्या जागेतील पेट्रोल पंपाच्या कॅनॉपी खाली कोसळले. यावेळी या अजस्र लोखंडी होर्डींग्ज खाली पेट्रोल भरायला आलेले नागरिक आणि तसेच जोरदार पाऊस कोसळत असल्याने पंपाच्या कॅनॉपी खाली आसऱ्यासाठी थांबलेले असताना अचानक होर्डींग्ज कोसळून शेकडो लोक दबले गेले. या प्रकरणातील होर्डींग्ज कंपनी इगो मिडीया प्रा. लिमिटेडचा मालक भावेश भिंडे याचा सर्वत्र पोलिस शोध घेत आहेत.
कोण आहे भावेश भिंडे ?
भावेश भिंडे याच्या विरोधात मुंबई पोलिसांना सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. भावेश भिंडे याच्या विरोधात जानेवारी महिन्यात मुलुंड पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून त्या प्रकरणात त्याच्यावर कोर्टात आरोपपत्र देखील दाखल झाले आहे. साल 2009 मध्ये मुलुंड येथून भावेश भिंडे आमदारकीला उभा राहीला होता. त्यावेळी त्याने निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्याच्यावर 23 गुन्हे दाखल झाल्याची माहीती दिली होती. भावेश भिंडे याच्यावर मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन अॅक्ट आणि नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्टचा चेक बाऊन्सिंग झाल्याचा गुन्हा दाखल आहे. तसेच होर्डींग्ज बसविताना पालिका आणि रेल्वेचे नियम पायदळी तुडविल्याचे अनेक गुन्हे भिंडे याच्यावर दाखल झालेले आहेत. तसेच झाडांना विष घालून मारल्याचा गुन्हा देखील मुंबई महानगर पालिकेने त्या्च्यावर दाखल केला आहे.
गुजू अॅड्सचा मालक
अलिकडे भावेश भिंडे याने गुजु अॅड्स नावाची कंपनी काढून मुंबईत सर्वत्र फलकबाजी केली होती. मुंबई महापालिकेकडून त्याच्यावर अनेकदा कारवाई करुन त्याची गुजू अॅड्स जाहीरात कंपनी काळ्या यादीत टाकली होती. त्यानंतर त्याने नवीन नावाने इगो मिडीया प्रा. लि. कंपनी काढून पुन्हा मुंबईतील मोक्याच्या जागांवर होर्डींग्ज उभारण्याचा धंदा सुरु केला. सोमवारी जोरदार पावसात कोसळलेले होर्डींग्जने 14 जणांचा बळी घेतला. त्याच्या या कोसळलेले होर्डींग्जचा आकार 120 बाय 120 फूट इतका प्रचंड असल्याने त्याचा समावेश सर्वात मोठे जाहीरात होर्डींग्ज म्हणून लिमका बुकात नोंद झाली होती.