Rekha Jare Murder Case | मामी, लैला, पंटर, राजा, बकरे आणि बाळ बोठे!
रेखा जरे हत्याकांडात फरार आरोपी बाळ बोठेनं उघड केलेलं हनी ट्रॅपचं प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. (Rekha Jare Murder Case)
अहमदनगर : रेखा जरे हत्याकांडात फरार आरोपी बाळ बोठेनं उघड केलेलं हनी ट्रॅपचं प्रकरण सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. या सीरिजमध्ये बाळ बोठेनं अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे, या गोष्टींचा हत्याकांडाशी जवळचा संबंध असण्याची शक्यता आहे. बाळ बोठे हनी ट्रॅपच्या सीरिजमध्ये नेमकं काय लिहीत होता आणि त्यानं ज्या हनीट्रॅपच्या उलगडा केला, त्यात बाळ बोठेही सामील होता का हेच आपण पडताळण्याचा प्रयत्न करु. (Rekha Jare Murder Case Bothe And Honey Trap Connection)
मागील लेखात आम्ही तुम्हाला हनी ट्रॅपच्या सीरिजचा काही भाग सांगितला होता. त्यातील पुढचा भाग आता आम्ही तुम्हाला सांगतोय. हनी ट्रपची साखळी समजावून सांगताना बाळ बोठेनं व्यक्तीच्या नावांसह ठिकाणांच्या आणि जाळ्यात फसवण्याच्या पद्धतीची इत्यंभूत माहिती दिली.
आपल्या लेखातून बाळ बोठे सावज कसे हेरायचा?
मामी, लैला, पंटर, राजा, बकरे असे शब्द वापरत त्यानं सगळं प्रकरण समजावून सांगितलं. ज्या व्यक्तींना शहरातील समाजकारण आणि राजकारण चांगलं माहितीय, त्यांना ही लोक कोण हे समजत होतं, मात्र अनेकांना फक्त ही पात्र वाटत होती. याद्वारे त्याला हवा तो ब्लॅकमेलिंगचा संदेश त्या त्या व्यक्तीपर्यंत पोहचत होता. आणि त्यातूनच बाळ बोठे डील करायचा असं आता बोललं जातंय.
हनी ट्रॅपच्या जाळ्यात कसे ओढलं जात होते?
सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना पुढे करून पोलिसांसह विविध खात्यांमधील अधिकारी, व्यापारी व धनिकांना खोट्या प्रेमाच्या मोहजालात ओढायचे. नंतर त्यांच्यासोबत अनैतिक कृत्ये करायची. ती सुरू असतानाच संबंधित ठिकाणी “छापा’ घालायचा. संबंधित व्यक्तीवर दहशत निर्माण करून त्यांचे चित्रीकरण करायचे. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन “भाव’ वाढवायचा. नंतर “मांडवली’ करून पाच ते वीस लाखांपर्यंतची रक्कम उकळायची आणि त्यातून चैनबाजी करायची.
प्रतिष्ठीत घरातील महिलांचा सहभाग?
हे सांगताना त्यानं शहरातील प्रतिष्ठीत घरातील महिला या उद्योगात मुख्य सूत्रधार असल्याचं त्यानं सांगितलं. शिवाय या महिलांचे पतीही त्यांना याबाबतीत साथ देत असल्याचा धक्कादायक खुलासा त्यानं केला. हेच सांगत असताना त्यानं या टोळ्यांची कार्यपद्धतीही त्यानं सविस्तर समजावून सांगितली.
बाळ बोठेनं सांगितलेली हनी ट्रॅपची कार्यपद्धती
- मोठ्या पदावरील अधिकारी, व्यापारी व पैसेवाल्यांचा शोध घेणे.
- टोळीतील महिलांना पुढे करून त्यांना सोशल मीडियावर जोडून घेणे.
- अर्धनग्न फोटो आणि अश्लील व्हिडिओ पाठवून त्यांच्याशी सलगी करणे.
- त्यानंतर अनैतिक कृत्ये करण्यासाठी संबंधितांना भाग पाडायचे.
- “गिऱ्हाईक’ किती वजनदार आहे, याची खातरजमा करून नियोजन करायचे.
- गरज भासल्यास मर्जीतील पोलिस अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना सहभागी करायचे.
- “शय्यासोबत’ करायचे ठिकाण आणि त्या परिसरात “मोहीम’ फत्ते होईपर्यंत “विशेष’ लक्ष ठेवायचे.
- टोळीतील महिलेकडून “मोहीम’ फत्ते झाल्याचा संदेश येताच “छापा’ घालून दहशत निर्माण करायची.
- संबंधित व्यक्तीशी शय्यासोबत केलेल्या महिलेचे तातडीने फोटो काढायचे.
- कबुलीजबाबवजा व्हिडिओ चित्रीत करून संबंधितांना तो व्हायरल करण्याची धमकी द्यायची.
- प्रकरण मिटविण्यासाठी अवाजवी पैशांची मागणी करून काही लाखांमध्ये रक्कम उकळायची.
- त्या पैशांचे वाटप करायचे. काही पैसे सहल व पार्टीसाठी राखीव ठेवून “मोहीम’ साजरी करायची.
- जेव्हा जेव्हा टंचाई भासेल, तेव्हा पुन्हा संबंधितांना धमकावून त्यांच्याकडून पैसे वसूल करायचे.
आता ही कार्यपद्धती बाळ बोठेनं सविस्तर कशी मांडली, त्याला ही माहिती कुणी दिली आणि याच पद्धतीच्या वापरात बाळ बोठेही सहभागी नाही ना? हे शोध घेणं जास्त गरजेचं आहे.
हनी ट्रॅप, रेखा जरे प्रकरण एकमेकांशी संबंधित?
विशेष म्हणजे नगर शहरामधील अनेक बडे मासे या हनी ट्रॅपच्या भोवऱ्यात फसले आणि कोट्यवधी रुपये त्यांनी या फंदात उडवले असंही त्यांनं सांगितलं. त्यामुळे इथं कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचं स्पष्ट आहे. हेच पाहता या उलाढालीतूनच तर हे हत्याकांड घडलं नाही ना? आणि रेखा जरे यांचा या हनी ट्रॅपच्या मालिकेशी काही संबंध आहे का? हे पडताळणं अत्यंत गरजेचं आहे..तरचं या गुन्ह्याचं खरं कारण समोर येईल…(Rekha Jare Murder Case Bothe And Honey Trap Connection)
संबंधित बातम्या :
बाळ बोठे फरार; काय काय घडलं कोर्टात?
रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या हनी ट्रॅपचं ‘मटेरियल’ वाचलंत?
रेखा जरे हत्याकांडात बोठे आणि हनी ट्रॅपची जोरदार चर्चा; काय आहे नेमकं प्रकरण?