औरंगाबाद : औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात निवासी डॉक्टरांचं आंदोलन सुरु आहे (Resident doctors strike in Aurangabad). तीन महिन्यांपासून पगार थकल्यामुळे निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलं आहे. निवासी डॉक्टरांचे वैद्यकीय अधिक्षक कार्यालयासमोर निदर्शने सुरु आहेत. रुग्णालय प्रशासनाविरोधात डॉक्टरांची घोषणाबाजी सुरु आहे.
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 490 निवासी डॉक्टरांचे तीन महिन्यांपासून पगार थकले आहेत. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तीन महिन्यांचा पगार तातडीने द्या, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे (Resident doctors strike in Aurangabad).
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह विदर्भातून रुग्ण येतात. या रुग्णांवर निवासी डॉक्टरांकडून उपचार केला जातो. आंदोलन करणाऱ्यांपैकी बरेचसे डॉक्टर कोरोना रुग्णांवरदेखील उपचार करत आहेत. तर काही डॉक्टर इतर आजारांवर उपचार करत आहेत.
हेही वाचा : Corona pandemic | येत्या दोन वर्षात कोरोनाचा नायनाट होईल, WHO प्रमुखांना विश्वास
कोरोना संकटकाळात स्वत:चा जीव धोक्यात टाकून डॉक्टरांकडून रुग्णसेवा सुरु आहे. मात्र, गेल्या तीन महिन्यांपासून घाटी रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरांना पगार मिळाला नाही. याआधी डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यावेळी प्रशासनाकडून डॉक्टरांना रक्कम जमा झाली असून लवकरच पगार होईल, असं आश्वासन देण्यात आलं. मात्र, अद्यापही डॉक्टरांचा पगार झालेला नाही.
“फक्त औरंगाबादेतील शासकीय महाविद्यालयाचे निवासी डॉक्टरच नाहीत तर महाराष्ट्रातील प्रत्येक शासकीय महाविद्यालयात रुग्णालयाचा कणा म्हणून निवासी डॉक्टरांना ओळखलं जातं. मात्र, याच निवासी डॉक्टरांना गेल्या दोन महिन्यांपासून विद्यावेतनापासून अलिप्त ठेवण्यात आलं. ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. गेल्या आठ दिवसांपासून पगाराचे पैसे पास झालेत असं सांगितलं जात आहे. मग नेमकी माशी कुठे शिंकली? असा प्रश्न उपस्थित होत आहे”, अशी प्रतिक्रिया आंदोलक डॉक्टरांनी दिली.
“पगार होत नसल्याने सर्वांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. आमच्यासाठी रुग्णसेवा प्राथमिक आहे. पण दोन दिवसात प्रशासनाला जाग आली नाही तर आम्हाला कोव्हिड सेवादेखील बंद करावी लागेल”, असा इशारा निवासी डॉक्टरांनी दिला.
हेही वाचा : दिल्लीत ISIS चा अतिरेकी पकडला, दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला