त्यांना आमदारकीचे डोहाळे लागले; रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर भिडल्या
रोहिणी खडसे आणि रुपाली चाकणकर या राष्ट्रवादीच्या दोन गटातील महिला नेत्यांमध्ये कलगीतुरा लागला आहे. एकनाथ खडसे यांची सून भाजपाच्या तिकीटावर खासदार झाली असल्याने या टिकेमुळे खळबळ उडाली आहे.
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्या रुपाली चाकणकर आणि एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांच्या जोरदार खंडाजंगी झाली आहे. भाजपाच्या तिकीटावर एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. तर कन्या रोहिणी खडसे या राष्ट्रवादीत असल्याने या वादाला वेगळे परिमाण लाभले आहे. दोघी नेत्यांनी अशा प्रकारे एकमेकींचे वाभाडे काढल्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
रूपाली चाकणकर यांना आमदारकीचे डोहाळे लागले असून त्यांनी आधी नगरसेवक होऊन दाखवावं अशी झोंबरी टीका राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी केली होती. यानंतर रुपाली चाकणकर यांनी जोरदार पलटवार केला आहे. सोन्याचा चमचा घेऊन आल्याने त्यांनी स्वतःचं कर्तुत्व नसताना वडीलांच्या नावावर पद मिळवलं. त्यांना टीका करण्याचा काहीही अधिकार नसल्याचा सनसनीत टोला रूपाली चाकणकर यांनी लगावला आहे.
सीडी आहे सांगून राष्ट्रवादी प्रवेश मिळविला
आमच्याकडे सीडी आहे असे सांगून राष्ट्रवादीत प्रवेश मिळवला आणि अजूनही ती सीडी बाहेर बाहेर आलेली नाही. वडील विधान परिषदेचे सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘तुतारी ‘ मधून ते आता भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे कोणाचा कोणाला पायपोस नाही त्यामुळे अशा पद्धतीने स्वतःच्या पक्षाला फसवणारे आणि इतरांवर टीका करणारे याच्यावरून त्यांची मानसिकता आणि बुद्धिमत्ता किती आहे हे कळून येत असल्याचेही रूपाली चाकणकर म्हणाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत तुतारीचा प्रचार करण्याचे सोडून भाजपचा प्रचार केल्याचा आरोपही चाकणकर यांनी रोहिणी खडसे यांच्यावर केला आहे.