…तर विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करावं म्हणत रोहित पवारांचा भाजपला टोला, आजोबांच्या सल्ल्याचाही दिला दाखला
स्वत:च्या हितासाठी कोणी राजकीय टीका करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करावं असं बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं आहे, असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार लगावला. ( Rohit Pawar Ram Shinde Sharad Pawar)
अहमदनगर : “स्वत:च्या हितासाठी कोणी राजकीय टीका करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करावं असं बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं आहे,” असा टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांना उद्देशून लगावला. अहिल्याबाई होळकर पुतळा अनावरण प्रकरणावर बोलताना शरद पवारांच्या वक्तव्यामधून अहिल्याबाईंचा अपमान आणि नातवाविषयी प्रेम, दिसून येतं अशी खरमरीत टीका राम शिंदें यांनी केली होती. या टीकेविषयी विचारले असता रोहित पवार यांनी वरील शब्दात उत्तर दिले. ते अहमदनगरमध्ये बोलत होते. (Rohit Pawar criticizes Ram Shinde on Sharad Pawar statement)
“स्वतःच्या हितासाठी कोणी राजकीय टीका करत असेल तर तर त्याकडे दुर्लक्ष करावं, असं बऱ्याच अभ्यासू लोकांनी आम्हाला सांगितलं आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात लढाण्याचे निश्चित झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्यावेळी बोलताना, जामखेड तालुक्यात चौंडी जे गाव आहे. त्या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे जन्म ठिकाण आहे. त्यामुळे त्या भूमीत एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रतिनिधित्व करण्याची तुला लोक देणार आहेत. ते तुझ्यासाठी भाग्याचं आहे, असं मला शरद पवार यांनी सांगितलं होतं,” असं रोहीत पवार म्हणाले. तसेच, ज्या थोर व्यक्तीने प्रशासनावर, पाण्यावर आणि अध्यात्माविषयी ज्या पद्धतीने काम केलं त्या गोष्टी तू आत्मसात कर. सर्वसामान्यांच्या हितासाठी तू लढ असा सल्लाही शरद पवार यांनी दिला होता, असेही रोहित पवार म्हणाले.
नेमके प्रकरण काय ?
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नियोजित वेळे आधी जेजुरी येथील अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. या पुतळ्याचे अनावरण शरद पवार यांच्या हस्ते होणार होते. मात्र, त्याआधीच पडळकर यांनी मेंढपाळाच्या हस्ते अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण केले. या प्रकरणावर बोलताना “अहमदनगर जिल्ह्यातून जामखेड तालुक्यातून जिथून राष्ट्रवादीचे रोहित पवार आमदार म्हणून विधानसभेवर जातात ज्या मतदारसंघातल्या चौंडीला अहिल्याबाई होळकर यांचा जन्म झाला”, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. शरद पवार यांच्या वक्तव्यानंतर अहिल्याबाईंच्या जन्माचं ठिकाण सांगण्याकरिता रोहित पवारांचं आणि त्यांच्या मतदारसंघाचं नाव घेण्याची खरंच गरज होती का? असा प्रश्न विचारला जाऊ लागला.
राम शिंदे आक्रमक
त्यानंतर “अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवारांनी जे नातवाच्या प्रेमापोटी वक्तव्य केलं त्या वक्तव्याने अहिल्यादेवींचा अपमान झालाय. पवारांची ही गंभीर चूक आहे. त्यांच्या बोलण्यातून अहिल्यादेवीपेक्षा नातवाचा मतदारसंघ श्रेष्ठ आणि त्यांच्या मतदारसंघात अहिल्यादेवीचा जन्म झाला आहे, असं सूचित करणारं पवारांचं वक्तव्य होतं. जे अतिशय गंभीर होतं. पवारांची ही गंभीर चूक आहे,” अशी टीका राम शिंदे यांनी केली होती.
राम शिंदे यांच्या याच टीकेला प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनी स्वत:च्या हितासाठी कोणी राजकीय टीका करत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करावं असं बऱ्याच लोकांनी आम्हाला सांगितलं असल्याचं म्हटलंय.
इतर बातम्या :
(Rohit Pawar criticizes Ram Shinde on Sharad Pawar statement)