अहमदाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी घटस्फोटाच्या वाढत्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली आहे. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक (Mohan Bhagwat on Divorce) आहे, असं मत भागवतांनी व्यक्त केलं.
‘घटस्फोटाची प्रकरणे आजकाल मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. किरकोळ कारणांवरुन जोडपी भांडतात. सुशिक्षित आणि संपन्न कुटुंबांमध्ये घटस्फोटाची प्रकरणे अधिक आढळतात, कारण शिक्षण आणि संपन्नतेसोबत अहंकारही येतो. त्यामुळे कुटुंबं विभक्त होतात. समाजही विभाजित होतो, कारण समाज हेही एक कुटुंब आहे’, अशी भूमिका मोहन भागवत यांनी मांडल्याचं संघाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत रविवारी संघाच्या कार्यकर्त्यांना अहमदाबादमध्ये संबोधत होते.
‘संघातील उपक्रमांबाबत स्वयंसेवकांनी आपल्या कुटुंबीयांनाही सांगावे, अशी आमची अपेक्षा आहे. कारण अनेकदा आपल्या कुटुंबातील महिलांना अधिक वेदनादायी कामं करावी लागतात’, असंही भागवत म्हणाले.
“हिंदू समाज सद्गुणी आणि संघटित असावा. जेव्हा आपण समाज म्हणतो, तेव्हा त्यात केवळ पुरुषच नसतात. आपुलकीची भावना ही समाजाची ओळख आहे” असं भागवत म्हणाले.
‘मी हिंदू आहे. सर्वधर्मीय श्रद्धास्थानांचा मी आदर करतो, मात्र माझ्या स्वत:च्या श्रद्धास्थानांबाबत मी आग्रही आहे. मला माझ्या कुटुंबाकडून संस्कार मिळाले आहेत आणि मातृशक्ती आम्हाला ते शिकवते, असाही उल्लेख भागवतांनी यावेळी केला.
Mohan Bhagwat on Divorce