धनगर आरक्षणाला विरोध करण्यासाठी सत्ताधारी आमदारच आंदोलन करणार; सरकारची डोकेदुखी वाढली
राज्यात एकीकडे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पेटला असताना आता धनगर आरक्षणाविरोधात आदिवासींनी मोर्चा खोलला आहे. विशेष म्हणजे विरोधकांनी नव्हे तर सत्ताधारी आमदाराच या आंदोलनाचे नेतृत्व करणार असल्याने सरकारची डोकेदुखी वाढली आहे.
एकीकडे मराठा आरक्षणवरुन मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरु असतानाच ओबीसी यांचे देखील आंदोलन सुरु आहे. दोन समुहाची आंदोलनात धनगराचे आरक्षणावरुन रान पेटविण्याची भाषा कोणी विरोधकाने नव्हे तर सरकारमधीलच घटक पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आदिवासी नेते विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ यांनी धनगरांच्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी शड्डू ठोकले आहेत. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार आहे.
विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवळ यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपल्या आंदोलनाची माहिती दिली आहे. ते पुढे म्हणाले की सर्व आदिवासी संघटनांच्या प्रमुखांना आणि आमदारांना माझी विनंती आहे. सध्या रखडलेल्या पेसा भरती ( PESA – Panchayat(Extension To Scheduled Areas) Act ,1996) संदर्भात मध्यंतरी विद्यार्थी आणि पालकांसोबत आंदोलन केले होते. त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी 15 तारखेपर्यंत भरती करु असे आश्वासन दिले होते. परंतू याबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. धनगरांची जी घुसखोरी सुरु आहे की आम्ही आदिवासी आहोत आम्हाला आदिवासीत घ्या अशी राज्यभर चर्चा सुरु झालेली आहे. कायदा ड्राफ्ट झाला आहे.या संदर्भात आम्ही आदिवासी आमदारांनी पिचड, गावित साहेब, माजी खासदार हीना गावित अशा सर्वांनी 23 तारखेला बैठक घेतल्याचे झिरवळ यांनी यावेळी सांगितले.
आरक्षणातील घुसखोरी रोखा
त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले की दोन दिवसात वेळ देतो. परंतू अद्यापही वेळ दिलेली नाही. दोनशे ते अडीचशे मुलं मुंबईतील माझ्या सुरुची निवासस्थानी ठाण मांडून आहेत. ती गावी जायला तयार नाहीत. आमचा निर्णय होत नाही. तोपर्यंत जाणार नाही अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री, आदिवासी विभागाचे सेक्रेटरी चिफ सेक्रेटरी या सर्वाना निवदेन दिले आहे. आम्ही सर्व आमदार मंत्रालयासमोर धरणे आंदोलन करणार आहोत. या आंदोलनसाठी महाराष्ट्रातीस सर्व आदिवासी संघटनांचे तरुण फोन करीत आहेत. त्यांना त्यांच्या ठिकाणी शांततेने आंदोलन करण्यासाठी सांगितले आहे. पेसा भरती सुरु करा आणि धनगरांची आमच्या आरक्षणातील घुसखोरी रोखा अशा आमच्या दोन मुख्य मागण्या असल्याचे झिरवळ यांनी म्हटले आहे.