233 प्रवाशांना घेऊन विमानाचं मक्याच्या शेतात इमर्जन्सी लँडिंग
इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मक्याच्या शेतातच हे विमान उतरवण्यात आलंय. विमानाचंही या इमर्जन्सी लँडिंगमुळे नुकसान झालंय. पण सुदैवाची गोष्ट म्हणजे सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
मॉस्को, रशिया : चमत्कार काय असतो याचा अनुभव रशियातील 233 (Russia emergency landing) प्रवाशांना आला. जवळपास अडीचशे प्रवासी घेऊन जात असलेल्या यूराल एअरलाईन्स एअरबस 321 या विमानाला इमर्जन्सी लँडिंग (Russia emergency landing) करावं लागलं. इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मक्याच्या शेतातच हे विमान उतरवण्यात आलंय. विमानाचंही या इमर्जन्सी लँडिंगमुळे नुकसान झालंय. पण सुदैवाची गोष्ट म्हणजे सर्व प्रवासी सुखरुप आहेत.
टेकऑफनंतर काही वेळातच विमानाला पक्षी येऊन आदळला आणि याचा इंजिनवरही परिणाम झाला. रशियाची राजधानी मॉस्कोजवळच गुरुवारी ही घटना घडली. रशियन आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, 23 प्रवाशांना दुखापत झाली आहे. पण यापैकी कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. त्यामुळे सर्व जण सुखरुप आहेत.
या विमानात सात क्रू मेंबर्स आणि 226 प्रवासी होते. मॉस्कोमधील झुकोवस्की विमानतळावरुन हे विमान रशियाला लागूनच असलेल्या क्रिमियामध्ये जाणार होतं. टेकऑफनंतर लगेच बिघाड जाणवला आणि धावपट्टीपासून एक किमीच्या अंतरातच विमान मक्याच्या शेतात उतरवण्यात आलं, अशी माहिती ट्रान्सपोर्ट कंपनी रोसावियात्सियाने दिली.
या घटनेनंतर प्रवाशांची तातडीने सुटका करण्यात आली, तर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं. जखमी झालेल्या 23 जणांपैकी 9 लहान मुलं आहेत. या चमत्कारिक घटनेनंतर वैमानिकाचे सर्वांनी आभार मानले. येकातेरिनबर्ग येथील रहिवासी असलेल्या वैमानिकाचं नाव दामिर युसुपोव असं आहे.
Emergency landing of an A321 near #Moscow in a corn field. 234 people on board 23 hospitalized for minor injuries, no fatalities. Cause seems to be birds leading to failure of one of the engines. #RussiaThe plane was flying from Shukovo Airport to Simferopol. pic.twitter.com/OSsouSW4Qy
— Kung Fu Koala (@kung_fu_koala) August 15, 2019