बाप्पा, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होऊ दे! शिवाजी पुतळा ते गणेश मंदिर, शिवसैनिकाचं दंडवत
शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते हरिदास पडळकर यांनी रस्त्यावर झोपून दंडवत घातलं आहे.
सांगली : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदावर विराजमान व्हावं, यासाठी शिवसैनिकांनी धरलेला आग्रह असो, किंवा मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, हा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेला ठाम विश्वास असो. मुख्यमंत्री आपलाच होणार, याची खात्री शिवसैनिकांना वाटत आहे. अशातच सांगलीतील शिवसैनिकाने रस्त्यावर दंडवत घालत गणपती बाप्पाला साकडं (Sangli Shivsainik Worships Ganesha) घातलं आहे.
शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते हरिदास पडळकर यांनी रस्त्यावर झोपून दंडवत घातलं आहे. सांगलीच्या शिवाजी पुतळ्यापासून गणपती मंदिरापर्यंत दोन किलोमीटर अंतर पडळकरांनी लोंटागण घालत पार केलं. भर उन्हात रस्त्यावर झोपून कसलीही तमा न बाळगता हरिदास पडळकर यांनी दंडवत घातलं. पडळकरांचं हे कृत्य सांगलीमध्ये चर्चेचा विषय (Sangli Shivsainik Worships Ganesha) ठरत आहे.
सामनातून संजय राऊतांनी सुचवलेले सत्तास्थापनेचे पाच पर्याय
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल आणि शिवतीर्थावर (शिवाजी पार्क) शपथविधी संपन्न होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठीच्या अंतिम निर्णयापर्यंत उद्धव ठाकरे पोहचले आहेत. सेनेच्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी शिवतीर्थावर होणार असल्याचा दावा संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला होता.
मुख्यमंत्रिपदाबाबत अडीच-अडीच वर्षांचा शब्द शिवसेनेला भाजपने कधीच दिला नव्हता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना-भाजप यांच्यात सुरु असलेली बोलणी फिस्कटली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.
याआधी, भाजप विश्वासदर्शक ठरावात अपयशी ठरल्यास दुसरा मोठा पक्ष म्हणून शिवसेना सरकार स्थापनेचा दावा करु शकेल. राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44) आणि इतरांच्या मदतीने बहुमताचा आकडा 170 पर्यंत जाईल, असं म्हणत शिवसेनेचं सरकार येण्याची शक्यता असल्याचं संजय राऊत यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून व्यक्त केली होती.