मोदींचा भरसभेत अपमान करायचा नव्हता, म्हणून गप्प बसलो, संजय राऊतांचं अमित शाहांना उत्तर
आम्हाला पंतप्रधान मोदींचा अपमान करायचा नव्हता, भाजपपेक्षा जास्त आदर आम्ही मोदींचा केला, आम्हाला त्यांचा अपमान करायचा नव्हता, असं उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut answer to Amit Shah) यांनी दिलं.
मुंबई : “माननीय अमित शाह म्हणतात की पंतप्रधान मोदी सभेत बोलत होते फडणवीसच मुख्यमंत्री तेव्हा शिवसेनेने आक्षेप घेतला नाही. त्याचं कारण म्हणजे आम्हाला पंतप्रधान मोदींचा अपमान करायचा नव्हता, भाजपपेक्षा जास्त आदर आम्ही मोदींचा केला, आम्हाला त्यांचा अपमान करायचा नव्हता”, असं उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut answer to Amit Shah) यांनी दिलं. नेहमीप्रमाणे त्यांनी (Sanjay Raut answer to Amit Shah) आज सकाळी पत्रकार परिषद घेतली. अमित शाह यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्रिपदावर पहिल्यांदाच भाष्य केलं होतं. आम्ही प्रत्येक सभांमध्ये सांगत होतो की युतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील, तेव्हा शिवसेनेने आक्षेप का घेतला नाही असं अमित शाह म्हणाले होते. त्याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं.
मोदी सर्व सभांमध्ये फडणवीस मुख्यमंत्री होतील असं म्हणत होते, पण उद्धव ठाकरेही सांगत होते, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, तेव्हा तुम्ही का रोखलं नाही? लोकसभा निवडणुकापूर्वी का बोलला नाहीत? विधानसभा निवडणुकीनंतर बोलत आहात, आता बोलत आहेत, ही नैतिकता नाही, असं संजय राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदींपर्यंत सत्य गेलेलं नाही, त्यातून वाद निर्माण करुन मोदी आणि बाळासाहेबांचं भावनिक नातं तोडण्याचा प्रयत्न : संजय राऊत
आम्ही पंतप्रधान पदाच्यापदाची प्रतिष्ठा राखतो, उद्धव ठाकरे आणि अमित शहा यांच्यात बंद खोलीत काय झालं हे मोदींना सांगितलं गेलं नाही. शिवसेना आणि नरेंद्र मोदी यांचं नातं वेगळं आहे. या नात्यांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा डाव भाजपमधील लोकांचा आहे, असा आरोपही संजय राऊत यांनी केली.
आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडायचं नव्हतं. नरेंद्र मोदी, हे असं झालं नव्हतं, असं आम्ही सांगू शकलो असतो, परंतु पंतप्रधानांचा अपमान करायचा नव्हता, बंद दाराआड झालेल्या चर्चा मोदींपर्यंत पोहचवल्या नसाव्यात : संजय राऊत
बंद खोलीतील चर्चा उघड होऊ नये, मात्र ही चर्चा सामान्य नव्हती, स्वाभिमानाची होती, ती चर्चा महाराष्ट्राच्या भवितव्याची होती, राजकारणात सत्याचा बोलबाला होत नाही, मात्र शिवसेनेने राजकारणाचा बाजार मांडला नाही, असं संजय राऊत म्हणाले.
बंद खोलीतील विषय हा महाराष्ट्राच्या नेतृत्वाचा होता, दिल्या-घेतलेल्या वचनांचा होता : संजय राऊत
महाराष्ट्रा शाहू-फुले-आंबेडकरांचा, शिवछत्रपतींचा आहे, या महाराष्ट्रात कधी राजकारणाचं व्यापारीकरण झालं नाही, बंद खोलीतील चर्चा पंतप्रधानांपर्यंत पोहोचली असती, तर ही बाब इथपर्यंत पोहोचलीच नसती, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
ज्या खोलीत चर्चा झाली, ती खोली सामान्य नव्हती, ती बाळासाहेबांची खोली होती, त्याच खोलीतून बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा नारा दिला, त्याच खोलीत उद्धव ठाकरे आणि अमित शाहांमध्ये चर्चा झाली. ती केवळ खोली नाही तर मंदिर आहे, त्या मंदिरात या सर्व चर्चा झाल्या. मंदिरात खोटं बोलू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
तुमच्यासाठी ती खोली असेल, आमच्यासाठी ते मंदिर आहे, तिथे बाळासाहेब वावरले आहेत, त्या मंदिरातील चर्चा तुम्ही नाकारत असाल, तर… असं म्हणत संजय राऊत यांनी हात जोडले.