मुंबई : महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या मागे ईडीची पीडा लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यापाठोपाठ आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही मोठा धक्का बसला आहे. संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी संदीप राऊत यांना चौकशीचं समन्स बजावलं आहे. या समन्सनुसार राऊतांना पुढच्या आठवड्यात चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याआधी कथित खिचडी घोटाळ्या प्रकरणी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीनंतर आता संदीप राऊत यांना ईडीचं समन्स पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे संदीप राऊत यांची याआधी मुंबई गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आता ईडीकडून त्यांची चौकशी केली जाणार आहे.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रो प्रकरणी चौकशी सुरू आहे. गुरूवारी किशोरी पेडणेकर यांना कथिचत कोविड बॉडी बॅग प्रकरणी चौकशीसाठी बोलावलं आहे. तर रवींद्र वायकर यांनाही भूखंड घोटाळ्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती.
सध्याचा काळ हा शरद पवार गट आणि विरोधकांसाठी संघर्षाचा आहे. आव्हान येत राहतील आम्ही त्यावर मात करून संघर्ष करू. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आमची ही लढाई असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने मुंबईमध्ये अडकून पडलेल्या मजुरांसाठी बृहन्मुंबई महापालिकेने खिचडी वाटप केली होती. खिचडी वाटपाचं कंत्राट आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी राजकीय दबावाखाली फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या खासगी फर्मला मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात ठाकरे नवनवीन नेत्यांची चौकशी होत आहे.