ध्यानधारणेवरून संजय राऊतांनी नरेंद्र मोदींना डिवचलं; म्हणाले, चारही बाजूने कॅमेरा लावून…
Sanjay Raut on PM Narendra Modi and Loksabha Election 2024 : 4 जूनला कळेल की इंडिया आघाडी जिंकतीये. संपूर्ण देश राहुल गांधी यांच्यासोबत आहे, असं संजय राऊत म्हणाले. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही संजय राऊतांनी टीका केली आहे. वाचा सविस्तर.....
भारताच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या कन्याकुमारीतील ‘विवेकानंद मेमोरिअल रॉक’ या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ध्यानधारणा करत आहेत. जिथे स्वामी विवेकानंद यांनी ध्यान केलं होतं. त्याच दगडावर बसून पंतप्रधन नरेंद्र मोदी ध्यान करत आहेत. ध्यान करतानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटोही समोर आले आहेत. यावरून विरोधकांनी टीका केली आहे. चारही बाजूने कॅमेरा लावून मोदी ध्यानधारणा करत आहेत, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
मोदींवर निशाणा
नरेंद्र मोदी चारही बाजूने कॅमेरा लावून कोण ध्यान धारणा करत आहेत, असं ध्यान कोण करतं? कुंभकर्णाला चार जून नंतर जाग करू… पूर्वीच्या लोकांनी ध्यान धारणा करताना किती सिक्युरिटी वापरली होती? 3000 सुरक्षारक्षक हाताशी पकडून हे ध्यान करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले. निवडणूक आयोगाला हाताशी पकडुन आपल्या सोयीच्या तारखा घेतल्या आहेत. राजकारणातील सेलिब्रिटी यांच्या तारखा बघून मुद्दामून मोदींनी स्वतःची निवडणूक शेवट ठेवली, असा आरोपही संजय राऊतांनी केला आहे.
राहुल गांधींना पाठिंबा
4 जूनला कळेल की इंडिया आघाडी जिंकतीये. संपूर्ण देश राहुल गांधी यांच्यासोबत आहे. आम्ही सगळे राहुल गांधींच्या बाजूने आहोत. मुद्दाहून राहुल गांधी याना बदनाम करण्यात आला आहे. या निवडणुकीत त्यांनी फार मेहनत केली आहे. ते आपण सगळ्यानी पाहिले आहे. त्यामुळे त्यांना आमचा पाठिंबा असेल, असं संजय राऊत म्हणाले.
पुण्यातील अपघातावर काय म्हणाले?
पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणावरही संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. यंत्रणांचा दुरुपयोग केला आहे. राजकीय व्यक्तीचा हात आहे. एकाला वाचवण्यासाठी किती लपवाछपवी करणार? संपूर्ण सरकार त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. भर रस्त्यावर जो दारू पिऊन खून करतो. त्यामध्ये किती दबाव आणला गेला, हे लोकांसमोर आलं आहे. रविंद्र धंगेकर यांचं कौतुक आहे. ज्या पद्धतीने त्यांनी सगळं प्रकार बाहेर आणलं, असं संजय राऊत म्हणाले.