Rain Update | साताऱ्यासह पुणे-कोकणात पावसाची जोरदार हजेरी, सिंधुदुर्गात दरड कोसळली
मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, कोकण भागात कालपासून पावसाचा जोर वाढला आहे. प्रमुख धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. मुंबई शहर, उपनगरासह आसपासच्या परिसरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई : महापुराच्या संकटातून सावरत असलेल्या कोल्हापूर (Kolhapur Rain), साताऱ्यात (Satara) पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. कोकण (Konkan), पुण्यातही (Pune) पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. प्रमुख धरणांतील पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे पुन्हा पाणी साचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे.
मुंबई शहर, उपनगरासह आसपासच्या परिसरात रात्रीपासून पावसाने जोर (Mumbai Rain) धरला आहे. ठाणे, डोंबिवली, कल्याण, भिवंडीसह नालासोपारा, विरार परिसरात पाऊस सुरु आहे. पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक (Western Railway) उशिराने सुरु आहे. गणपती बाप्पांच्या आगमनासह वरुणराजाचंही पुनरागमन झालेलं आहे.
साताऱ्यात दमदार
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील भागात पावसाला सुरुवात झाली आहे. सातारा शहरासह महाबळेश्वर, वाई, जावळी भागात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. महाबळेश्वरमध्ये काल 96 मिमी, तर कोयनानगर परिसरात 66 मिमी पावसाची नोंद आहे.
मुंबई, ठाणे, कल्याणसह परिसरात पावसाचा जोर, पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्यामुळे धरणात येणारी पाण्याची आवक वाढली आहे. धरणाचे दरवाजे सहा फुटांवर उघडण्यात आले आहेत. कोयना धरणातून 56 हजार 372 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.
कोकणात कोसळधार
कोकणात सगल चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात गेलेल्या गणेशभक्तांची पावसामुळे तारांबळ उडाली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस होत आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पावसाचा जोर दिसत आहे.
सिंधुदुर्गात दरड कोसळली
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गगनबावडा घाटात मोठी दरड कोसळली. दरडीचा काही भाग रस्त्यावर पडल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. कोल्हापूरवरुन येणाऱ्या घाट रस्त्याच्या सुरुवातीलाच दरडीचा भाग कोसळला. त्यामुळे सिंधुदुर्ग ते कोल्हापूर जोडणाऱ्या घाटात अनेक वाहनं अडकली आहेत.
दक्षिण रत्नागिरीलाही रात्रीपासून पावसाने झोडपलं. राजापूर तालुक्यातील मुर तळवडे रस्त्यावर दरड कोसळली. जामदा खोऱ्यातील 20 ते 25 गावांचा संपर्क तुटला. येत्या 48 तासात आणखी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
नागोठण्यात पाणी शिरलं
रायगड जिल्ह्यात ताम्हणी-माणगाव घाटात दरड कोसळली असून रस्ता वाहतुकीसाठी बंद आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे पुंडलिका, अंबा, सावित्री नदीच्या पाणलोट क्षेत्रात वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नागोठणे शहरात पाणी शिरलं आहे, तर पेणमधील खरोशी गावात गुडघाभर पाणी साचलं आहे. मुंबई-पुणे जुन्या हायवेवरुन एक्स्प्रेस वेला जाणाऱ्या जोडरस्त्याला खालापूरमधील सावरोल जवळील पुलावरुन पाणी जात असल्यामुळे दोन्ही दिशेची वाहतूक रोखून धरण्यात आली आहे. मात्र मुंबई-गोवा हायवेवरील वाहतूक सुरळीत असून जनजीवन मात्र विस्कळीत आहे.
खडकवासला धरणाचा विसर्ग वाढणार
पुण्यात खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढणार आहे. धरणातून 27 हजार 203 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे मुठा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढणार आहे. नदीपात्रातील भिडे पूलही पाण्याखाली जाण्याचा अंदाज आहे. रस्ते जलमय होऊन वाहतूक बंद करण्यात येणार असल्याने शहरात वाहतुकीची कोंडी होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरातील अनेक ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यातच आता नदीपात्रातील रस्ते बंद झाल्याने वाहतूक कोंडीची दुहेरी समस्या भेडसावणार आहे.