अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत असं आम्हाला वाटतं, पवारसाहेब निर्णय घेतील; राष्ट्रवादीच्या नेत्याचं वक्तव्य
Shashikant Shinde on Ajit Pawar : महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद, अजित पवार अन् शरद पवार यांचा निर्णय; राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्याचं वक्तव्य चर्चेत
कोरेगाव : महाराष्ट्राचं मुख्यमंत्रिपद आणि अजित पवार याची मागच्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होतेय. अगदी अजित पवार भाजपसोबत जात मुख्यमंत्री होतील तिथपासून ते अजित पवार हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील इथपर्यंत चर्चाच चर्चा मागच्या काही दिवसांपासून होतेय. त्यावर आता राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत”
अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत हे आम्हालाही वाटतं. त्यांच्यात ती क्षमता आणि योग्यता आहे. पण तरिही महाविकास आघाडी म्हणून शरद पवार याबाबतचा निर्णय घेतील. त्यात अजितदादा अग्रस्थानी असतील, असं वाटतं, असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.
शरद पवारसाहेब आमचे कुटुंबप्रमुख आहेत. अजितदादा एक नेते आहेत. ते सक्षमपणे काम करतायेत. त्यांच्याबद्दल चर्चा घडवून अस्थिरता दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. येणाऱ्या काळात राज्यात सत्ता आणण्यासाठी अजितदादांची प्रमुख भूमिका असेल, असंही ते म्हणालेत.
मत मतांतरे असतात. पण त्याचा परिणाम आघाडीवर होणार नाही. शक्यता नसताना पवारसाहेबांनी मविआ स्थापन केलीय. तेच ही आघाडी टिकवतीलही, असं शशिकांत शिंदे म्हणाले आहेत.
भाजपकडे वेगळ्या प्रकारचं नियोजन असतं. महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाचं त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जी घटना घडली. त्याच्याबद्दलचा रोष वळवण्यासाठी अजितदादांबद्दल बातम्या पेरल्या गेल्या. देवेंद्र फडणवीस पुन्हा येईन म्हणतात. मुख्य मुद्दे सोडून इतरत्र लक्ष वळवण्याचा हा प्रयत्न आहे, असंही शशिकांत शिंदे म्हणालेत.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर पर्याय नाही. महाराष्ट्रात नाराजी आहे. महाराष्ट्र हे संवेदनशील आणि भावनिक राज्य आहे.अशा पद्धतीचं राजकारण सहन केलं जाणार नाही. कर्नाटकचाही निकाल वेगळा लागलेला दिसेल. महाराष्ट्रातही ते घडेल, असं म्हणत शिंदे यांनी कर्नाटक निवडणुकीसह महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय.
1999 पासून राष्ट्रवादीच्या मागे उभा राहणारा सातारा जिल्हा आहे. सत्ताबदलानंतर आमच्या पक्षातील लोकांना भाजपनं ओढून घेतलं. सत्ता आणि पैशांचा वापर करुन सत्ता ताब्यात घेण्याचे प्रकार झाले. एक नविन फॅक्टर करण्याचा प्रयत्न झाला. आताच्या सत्ताधाऱ्यांनी सत्तेचा गैरवापर केल्यानंतरही आम्हाला यश मिळालं. जिथे आम्ही नव्हतो, तिथेही आम्हाला यश मिळालं. राज्य सरकारबद्दल लोकांच्या मनामध्ये रोष आहे, असं म्हणत शशिकांत शिंदे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.