औरंगाबादमध्ये एमआयएमच्या मोर्चाला लाखाची गर्दी, सतर्कतेसाठी थेट 72 दिवसांसाठी जमावबंदी
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात नागरिकांचा संताप पाहायला मिळत आहे. हेच चित्र औरंगाबादमध्येही दिसलं (Aurangabad protest against CAA).
औरंगाबाद : देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात नागरिकांचा संताप पाहायला मिळत आहे. हेच चित्र औरंगाबादमध्येही दिसलं (Aurangabad protest against CAA). औरंगाबादमध्ये या दोन्ही कायद्यांना विरोध करण्यासाठी 1 लाखाहून अधिक नागरिकांना उत्स्फुर्त हजेरी लावली. मात्र, यानंतर औरंगाबाद पोलीस आयुक्तांनी तात्काळ शहरात तब्बल 72 दिवसांसाठी कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश दिले आहेत. यामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे (Aurangabad protest against CAA).
नागरिक संविधानातील अधिकारानुसार शांततेच्या मार्गाने मोर्चा करत असताना पोलिसांनी जमावबंदी लागू करणे विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पोलिसांनी जमावबंदी लागू करताना अशा मोर्चे आणि आंदोलनांचा देश विघातक शक्ती उपयोग करू शकतात अशी शंका व्यक्त केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात लोकशाही मार्गाने निघणाऱ्या मोर्चे आणि आंदोलनांबाबत पोलीस प्रशासन काय मार्ग काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पोलिसांनी 72 दिवसांसाठी शहरात जमावबंदी केल्याने कुठल्याही पक्ष किंवा संघटनेला आंदोलन करता येणार नाही. याबद्दल सामाजिक संघटना आणि नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
औरंगाबादमध्ये एमआयएमचा महामोर्चा
Aurangabad tujhe lakhon salam!! pic.twitter.com/A1Z5n3ChWl
— imtiaz jaleel (@imtiaz_jaleel) December 20, 2019
औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्त्वात निदर्शने करण्यात आली होती. शुक्रवारच्या नमाजनंतर सर्व मुस्लिम नागरिकांनी, विविध शहरात उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरुन निषेध नोंदवला. सीएए आणि एनआरसी कायद्याविरोधात एमआयएमने औरंगाबादेत महामोर्चा काढला. जलील यांच्या नेतृत्वात आझाद चौकातून या महामोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महामोर्चा रोशन गेट, चंपा चौक, बुढी लाईन, भडकल गेट, दिल्ली गेट मार्गे विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला. या महामोर्चात मुस्लिम बांधव 1 लाखाहून अधिक संख्येने सहभागी झाले.