डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर गोळी झाडणारे कळसकर आणि अंदुरेच
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणात एक मोठा आणि महत्त्वाचा खुलासा झाला आहे.
पुणे: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणात एक मोठा आणि महत्त्वाचा खुलासा झाला आहे. डॉ. दाभोलकरांवर मी आणि सहकारी सचिन अंदुरेनेच गोळीबार केल्याची कबुली याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी शरद कळसकरने दिली. त्याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) न्यायवैद्यकीय चाचणी केली. त्यात हे स्पष्ट झाले.
सीबीआयने मंगळवारी न्यायालयात अहवाल सादर केला. यात न्यायवैद्यकीय चाचणीत कळसकरने पुनाळेकरांच्या सल्ल्यानेच गुन्ह्यातील शस्त्रे नष्ट केल्याचे कबुल केले, असे सांगितले. न्यायवैद्यकीय चाचणीत कळसकर म्हणाला, “मागील वर्षी जून महिन्यात मी अॅड. पुनाळेकरांची भेट घेतली होती. त्यावेळी पुनाळेकरांनी दाभोलकर हत्येत वापरलेली शस्त्रे नष्ट करण्यास सांगितले होते.”
दरम्यान, सीबीआयने दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपी कळसकरचे वकील अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना 25 मे रोजी अटक केली होती. त्यांचीही कसून चौकशी सुरु आहे. त्यांचे मोबाईल आणि लॅपटॉप देखील सीबीआयने ताब्यात घेतले आहेत.