उस्मानाबाद : “राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उस्मनाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. अतिवृष्टीमुळे उस्मानाबाद, नांदेड, लातूर, पंढरपूर, इंदापूर या भागात मोठे नुकसान झाले आहे. उस्मानाबाद हा पूर्ण जिल्हा संकटात सापडला आहे. शेतीच्या नुकसानीची मोठी किंमत महाराष्ट्राला मोजावी लागणार आहे,” अस मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. (Sharad Pawar Press Conference On Osmanabad visit)
“नदी ओढयाकाठी असलेल्या विहिरी, मोटारी वाहून गेल्या आहे. जनावरे वाहून गेली आहेत. घरांचे नुकसान झाले. सोयाबीनचे सर्वाधिक नुकसान झाले असून सोयाबीन कुजले, वाहून गेले आहेत. काही जिल्ह्यात नुकसानीची टक्केवारी जास्त आहे. तसेच मी आलो म्हणजे लगेच मदत मिळेल असे नाही,” असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.
“पाऊस जास्त झाल्यामुळे उसाची लागण यावर्षी मोठ्या प्रमाणात होईल असे दिसते, यंदा उसाचेही नुकसान झाले आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कारखाने सुरू झाले पाहिजेत. सध्या राज्यावर मोठे आर्थिक संकट आहे. त्यामुळे कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शक्य तितके जास्त कर्ज घ्यावे,” अशी विनंती शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना केली.
“संकटातून बाहेर काढण्यासाठी नियम बदलणे गरजेचे आहे. नेत्यांच्या दौऱ्याचा पूर सुरू झाला अशी टीका होते, मात्र याकडे पॉझिटिव्ह पाहिले पाहिजे. शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. त्यांच्या मागे उभे राहिले पाहिजे,” असेही शरद पवार म्हणाले.
“पीक विमा ऑनलाईनला शिथीलता द्यावी. पीक विम्यासाठी निकषांच्यानुसार फोटो अपलोड करणे शक्य नाही. मी स्वतः फोटो अपलोड करु शकत नाही,” असेही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
“शेतकऱ्यांनी काढून ढीग केलेलं सोयाबीन वाहून गेले. त्यांना सुद्धा मदत करणे गरजेचे आहे, शेती वाहून जाणे, सध्या वाहून गेलेल्या पिकांना मदत करण्याची तरतूद नाही, मात्र निकष बदल करणे गरजेचे असल्याचं मत शरद पवारांनी मांडले.” (Sharad Pawar Press Conference On Osmanabad visit)
संबंधित बातम्या :
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने कर्ज घ्यावं; शरद पवारांची मागणी