कोरोनामुळे 4,00,000 नाविक समुद्रात अडकले, मदतीसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला आवाहन
कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर इतर देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या जहाजांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बंदरं बंद होऊन जवळपास 4,00,000 नाविक आणि कर्मचारी समुद्रात अडकले आहेत.
वॉशिंग्टन : कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर इतर देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या जहाजांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे बंदरं बंद होऊन जवळपास 4,00,000 नाविक आणि कर्मचारी समुद्रात अडकले आहेत. यात असे अनेक नाविक (Seafarer) आहेत जे घरी येऊन 1 वर्षांपेक्षा अधिक काळ झालाय पण तरीही त्यांना समुद्रातच अडकून राहावं लागलं आहे. त्यामुळे अखेर या नाविक आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मदतीसाठी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीला आवाहन केलं आहे (Ship Association wrote letter to Jeff Bezos to help stranded Sea farers amid Corona lockdown).
कोरोना नियंत्रणासाठी आंतरराष्ट्रीय बंदरांवर अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे या बंदरावर वाहतूक करणाऱ्या व्यापारी जहाजांवर काम करणारे जवळपास 4,00,000 नाविक आणि कर्मचारी समुद्रात उभ्या असणाऱ्या जहाजांवर अडकले आहेत. यासाठी आता आंतरराष्ट्रीय शिपिंग इंडस्ट्री असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. तसेच अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांना पत्र पाठवत या नाविक आणि कर्मचाऱ्यांना वाचवण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. इंटरनॅशनल चेंबर ऑफ शिपिंगसह अनेक संघटनांनी गुरुवारी (26 नोव्हेंबर) जेफ बेजोस यांना संयुक्त पत्र लिहिलं. यात त्यांनी अमेरिकेत नव्याने सत्तेवर येणाऱ्या जो बायडन प्रशासनावर नाविकांना वाचवण्यासाठी दबाव आणावा अशी मागणी बेजोस यांच्याकडे केली आहे.
जेफ बेजोस यांना दिलेल्या पत्रावर समुद्री वाहतूक करणाऱ्या अनेक दिग्गज कंपन्यांनी स्वाक्षरी केली आहे. यात म्हटलं आहे, “या नाविकांशिवाय जागतिक व्यापाराचं कोणतंही अस्तित्व नाही. 4 लाखांपेक्षा अधिक नाविक आणि इतर कर्मचारी जागतिक व्यापाराचं काम करत या देशातून त्या देशात मालाची वाहतूक करतात. मात्र, सध्या ते जहाजांवरच अडकून पडले आहेत. सरकारला त्यांचं महत्त्व कळत नाहीये.”
“समुद्रात अडकलेल्या नाविकांपैकी काही नाविक तर 1 वर्षापेक्षा अधिक काळापासून समुद्रातच अडकले आहेत. जगातील 90 टक्के व्यापार जहाजांद्वारे होणाऱ्या समुद्री वाहतुकीवर अवलंबून आहे. या वाहतुकीशिवाय ‘सायबर मंडे’सारखे शॉपिंग इव्हेंटही शक्य नाही. या नाविकांनी अगदी कठिण काळातही आपलं काम केलं आहे. अमेझॉनसह अनेक प्लॅटफॉर्मच्या मागणीनुसार कोरोना काळातही सामानाची वाहतूक करण्यात आली. आता या नाविक आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी तुमची मदत आवश्यक आहे,” असंही या पत्रात म्हटलं आहे. असं असलं तरी असोसिएशनच्या या पत्राला अमेझॉनकडून अद्याप कोणतंही उत्तर देण्यात आलेलं नाही. त्यामुळे जेफ बेजोस काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या :
भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी जगातील टॉप-10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर!
अखेर मराठी भाषेचा अॅमेझॉन अॅपमध्ये समावेश, मनसेच्या आक्रमक भूमिकेची जेफ बेझोज यांच्याकडून दखल
Ship Association wrote letter to Jeff Bezos to help stranded Sea farers amid Corona lockdown