किरकोळ वादातून कोयत्याने तिघांचे गळे कापले, शिर्डीत भल्या पहाटे हत्याकांड
एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने साईनगरी शिर्डी हादरली. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
शिर्डी : एकाच कुटुंबातील तिघांच्या हत्येने साईनगरी शिर्डी हादरली. सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या झाली आहे. ठाकूर यांच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन पन्हाळेने किरकोळ वादातून हे हत्याकांड केल्याची प्राथमिक माहिती आहे. या हत्याकांडात 65 वर्षीय दादा ठाकूर, 60 वर्षीय दगडूबाई ठाकूर आणि 16 वर्षाची खुशी ठाकूर यांचा मृत्यू झाला.
अर्जुन पन्हाळेने आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ठाकूर दाम्पत्याचे कोयत्याने गळे कापले. तसंच शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या त्यांच्या 16 वर्षांच्या मुलीचीदेखील कोयत्यानं हत्या केली.
अर्जुन पन्हाळे यांच्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर (वय 35 वर्षे) आणि तावू ठाकूर (वय 18 वर्षे) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या कुटुंबातील एक सहा वर्षांची मुलगी वाचली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे शिर्डी हादरून गेली आहे.