MLA Ulhas Patil | हजारो गावकऱ्यांसह शिवसेना आमदार पुरात अडकले, ना वीज, ना मोबाईल, कोणताही संपर्क नाही
शिरोळचे शिवसेना आमदार उल्हास पाटील (MLA Ulhas Patil) यांना महापुराचा फटका बसला आहे. आमदार उल्हास पाटील (MLA Ulhas Patil) हे गावकऱ्यांसह पुरात अडकले आहेत.
कोल्हापूर : शिरोळचे शिवसेना आमदार उल्हास पाटील (MLA Ulhas Patil) यांना महापुराचा फटका बसला आहे. आमदार उल्हास पाटील (MLA Ulhas Patil) हे गावकऱ्यांसह पुरात अडकले आहेत. शिरोळ तालुक्यातील आलास या गावाचा संपर्क तुटला आहे. कृष्णा नदीच्या पूर्व किनाऱ्यावर आलास हे गाव आहे. या गावात उल्हास पाटील अनेक गावकऱ्यांसह अडकले असल्याची माहिती कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.
या गावात वीज नाही, त्यामुळे मोबाईल सुरु नाहीत, संपर्क साधण्यासाठी यंत्रणा नाहीत. त्याबाबतचा व्हिडीओ कृषीतज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला.
पाण्याला वेग प्रचंड आहे, त्यामुळे तिथे बोट चालत नाही. असंख्य लोक तिथे आहेत, त्यामुळे आमदार उल्हास पाटील हे सुद्धा त्यांच्यासोबतच आहेत. ते अनेकांना फोन लावण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र नेटवर्क व्यत्ययामुळे त्यांचा संपर्क होत नाही. पहाटे चारच्या सुमारास बुधाजीराव मुळीक यांच्याशी उल्हास पाटलांचा संपर्क झाला आणि त्याबाबतची माहिती मिळाली.
त्यानंतर बुधाजीराव मुळीक यांनी स्वत: प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान वर्षा बंगल्यावरही संपर्क साधून माहिती दिली. त्याशिवाय त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन याबाबतचा घटनाक्रम सांगितला.
आलास गावातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने तिथे एअरलिफ्ट करणे गरजेचं आहे, असं बुधाजीराव मुळीक यांनी टीव्ही 9 मराठीला सांगितलं.
“हजारो लोक अनेक ठिकाणी अडकून आहेत, जिथे अद्याप कोणाचा संपर्क झालेला नाही. ज्यांची माहिती मिळतेय, त्यांना मदत करण्याची तयारी सुरु होते, पण ज्यांची माहितीच मिळत नाही किंवा ज्यांच्याशी संपर्कच झाला नाही, त्यांचं काय? शिवाय शिरोळ हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचा तालुका आहे, तिथून पुढे कर्नाटक सुरु होतं. त्यामुळे कोल्हापुरातील पूर ओसरतो तेव्हा आधीच पाण्यात असलेलं शिरोळ आणखी पाण्यात जातं” असं बुधाजीराव मुळीक यांनी सांगितलं.
कोण आहेत आमदार उल्हास पाटील?
- उल्हास पाटील हे शिवसेनेचे कोल्हापुरातील शिरोळ मतदारसंघाचे आमदार आहेत.
- 2014 मध्ये ते विधानसभेवर निवडून गेले.
- उल्हास पाटील हे आधी राजू शेट्टी यांचे कट्टर कार्यकर्ते होते, मात्र विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला
- शेतकऱ्यांच्या अनेक आंदोलनात उल्हास पाटील हे सहभागी असतात.
- स्वाभिमानीची सगळी आंदोलन अंगावर घेतलेला साधा माणूस म्हणून उल्हास पाटील यांच्याकडे पाहिलं जातं होतं
- 2014 मध्ये त्यांनी भगवा खांद्यावर घेऊन शिवसेनेचं तिकीट मिळवलं आणि विक्रमी मताने निवडून आले.
य़