शिर्डी: कृषी विभागाच्या सहकार्यानं अकोले तालुक्यातील जांभळा – निळा भात राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचणार आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्यांनी आता विकेल ते पिकेल या धोरणानुसार जांभळा आणि निळा भात पिकाचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप यांनी केले. (Shivaji Jagtap said violet blue rice of Akole taluka will be reach in all regions of Maharashtra)
अकोले तालुक्यातील शिरपुंजे, धामणवन या भागातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेती शाळा आयोजित करण्यात आली होती. शेती शाळेत भात नर्सरी लागवड ते काढणी पश्चात विक्री व्यवस्थाबाबत कृषी विभागाच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी माजी आमदार वैभव पिचड उपस्थित होते.
जांभळ्या निळ्या भातामध्ये औषधी गुणधर्म
आदिवासी भागात सेंद्रिय शेतीचे गट असून त्यांनी लागवड केलेल्या जांभळ्या भाताला चांगली उत्पादकता मिळत आहे. या भाताची दर हेक्टरी 2800 किलो इतकी उत्पादकता आहे. हा जांभळा भात औषधी गुणधर्म असेलला तांदूळ असून त्यामध्ये न्यूट्रिशीयन्स व्हॅल्यू , मिनरल्स,व्हिटॅमिन्स आणि अँटी ऑक्सिडेंटस असल्याने व्याधीग्रस्त व्यक्तीला याचा फायदा होतो, तसेच यामुळे प्रतिकार शक्ती वाढते त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या जांभळा भाताचे महत्त्व आहे, असे शिवाजी जगताप म्हणाले आहेत.
जांभळ्या निळ्या भाताला बाजारभाव 300 ते 400 रुपये किलो मिळत आहे. या भाताचे ब्रँडिंग करून स्थापन केलेल्या साई ऑरगॅनिक या सेंद्रिय गटाद्वारे हा भात विकला जाणार असून यात कृषी विद्यापीठ आणि खाजगी संशोधनाचे अनेक वाण उपलब्ध आहेत. कोकण कृषी विद्यापीठाचे रत्नागिरी – 8 हे वाण लवकर या भागात आणणार असल्याचे जगताप यांनी सागितले.
आदिवासी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे : वैभव पिचड
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी विधेयकाचा फायदा आदिवासी शेतकरी घेत असून विकेल ते पिकेल या धोरणानुसार या भागातील शेतकऱ्यांनी जांभळा भात पिकवून, स्वतः विविध प्रदर्शनात तांदूळ विकत आहेत. शेतकऱ्यांचं अर्थकारण बदलत आहे, असं माजी आमदार वैभव पिचड म्हणाले आहेत.
जांभळ्या भातातील औषधी गुणधर्माचा उपयोग आजारी माणसांना होईल,या भातामुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करावी आणि आपला शेतीमाल स्वतः विकून फायदा मिळवावा, असे आवाहन माजी आमदार वैभव पिचड यांनी केले.
संबंधित बातम्या :
पंचनामे करून तात्काळ मदत द्या, मुख्यमंत्र्यांचं पीक नुकसान संदर्भात ट्वीट
ऊसाचं नुकसान झालं, तर भाताचं पीक घ्या, केंद्रीय पथकाचा पूरग्रस्तांना अजब सल्ला
(Shivaji Jagtap said violet blue rice of Akole taluka will be reach in all regions of Maharashtra)