Manohar Joshi | शिवसेनेचा ‘कोहिनूर’ हरपला, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच निधन झालं. आज (23 फेब्रुवारी ) पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते.
निवृत्ती बाबर, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 23 फेब्रुवारी 2024 : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं. आज (23 फेब्रुवारी ) पहाटे 3 वाजून 02 मिनिटांनी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 86 वर्षांचे होते. 21 फेब्रुवारी रोजी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने हिंदुजा हॉस्पिलमध्ये ॲडमिट केले होते. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे निदान झाल्याने त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. अंत्यदर्शनासाठी त्यांना माटुंगा पश्चिम, रुपारेल कॉलेज जवळील W54 या त्यांच्या सद्याच्या निवासस्थानी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळात ठेण्यात येणार आहे. दुपारी 2 नंतर अंत्ययात्रा सुरू होईल.
माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा अध्यक्ष सरांवर दादर स्मशान भूमीत शासकीय इतमामात अंत्य संस्कार होतील. मे 2023 मध्ये झालेल्या मोठ्या आजारावर त्यांनी जिद्दीने मात केली होती.
ब्रेन हॅमरेजचा झाला होता त्रास
मनोहर जोशी यांना याआधी ब्रेन हॅमरेजचा त्रास झाला होता. त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. त्यावेळी जवळपास महिनाभर जोशी यांच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. काल त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
उद्धव ठाकरे यांचा आजचा जनसंवाद दौरा रद्द होण्याची शक्यता
शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसांच्या बुलढाणा आणि हिंगोली दौऱ्यावर आहेत. मात्र मनोहर जोशी यांच्या निधनाच्या वृत्तानंतर उद्धव ठाकरे यांचा दोन दिवसांचा दौरा रद्द होण्याची शक्यता आहे.
शिवेसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार संजय राऊत यांनीही मनोहर जोशींना आदरांजली वाहिली. ‘ शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी, अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणून जगलेले, मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन!’ अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
शून्यातून विश्व निर्माण करणारे.. कडवट महाराष्ट्र अभिमानी अखेरच्या श्वासा पर्यन्त शिवसैनिक म्हणुन जगलेले मनोहर जोशी यांना विनम्र अभिवादन! pic.twitter.com/QV48ikmWv1
— Sanjay Raut (@rautsanjay61) February 23, 2024
ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही जोशी सरांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.
दुःखद! महाराष्ट्राचा ‘कोहिनूर’ आज पहाटे हरपला. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभा सभापती मनोहर जोशी सरांचे पहाटे निधन झाले. शिवसेनेच्या पहिल्या फळीचे नेते म्हणून पक्ष उभा करण्यात त्यांनी दिलेले योगदान मोठे व अनमोल आहे. विशेष म्हणजे शिवसेनेचा झंझावात हा ‘शिवसेना काल-आज-उद्या’ या पुस्तक… pic.twitter.com/zxB7JmLqk3
— Ambadas Danve (@iambadasdanve) February 23, 2024
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी वाहिली श्रद्धांजली
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनोहर जोशी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्य्कत करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री मनोहर जोशी सर यांच दुःखद निधन त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2024