‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत महाराजांचे हाल दाखवू नयेत, शिवसेना नेत्याची मागणी
अटकेनंतर संभाजी महाराजांचे जे हालहाल केले, ते संपूर्ण जगाला माहित आहेत. त्यामुळे ते चित्रिकरणाच्या माध्यमातून लोकांसमोर दाखवू नयेत.' असं मत शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी व्यक्त केलं आहे.
औरंगाबाद : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेत छत्रपती संभाजी महाराजांचा छळ झाल्याचा भाग दाखवला जाऊ नये, अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार अर्जुन खोतकर यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना यासंदर्भात विनंती करणार असल्याचंही खोतकरांनी (Chhatrapati Sambhaji Maharaj Serial) सांगितलं.
‘संपूर्ण महाराष्ट्राला ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांविषयी माहिती समजली. आता संभाजी महाराजांची अटक झालेली आहे. अटकेनंतर संभाजी महाराजांचे जे हालहाल केले, ते संपूर्ण जगाला माहित आहेत. त्यामुळे ते चित्रिकरणाच्या माध्यमातून लोकांसमोर दाखवू नयेत.’ असं मत खोतकरांनी व्यक्त केलं आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचे झालेले हाल टीव्हीवर प्रक्षेपित झाले, तर प्रेक्षकांच्या भावना उफाळून येतील, अशी भीतीही अर्जुन खोतकर यांनी बोलून दाखवली. ‘पुढचं प्रक्षेपण दाखवू नका, अशी विनंती मी ‘झी समूह’ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार आहे’ असं खोतकर म्हणाले. शिवसेनेने मराठवाड्यात आयोजित केलेल्या ‘पाणी परिषदे’च्या निमित्ताने खोतकर जालन्यात बोलत होते.
संभाजी महाराजांची कैद झाल्याचा एपिसोड
‘महाराज घात झाला… अशी किंकाळी ठोकत एक मावळा छत्रपती संभाजी महाराजांना शत्रूने केलेल्या गनिमी काव्याचा संदेश घेऊन येतो. इतक्यात शत्रूचं सैन्य महाराजांवर हल्ला करण्यासाठी येतं. दोघांमध्ये लढाई सुरु असतानाच एका बेसावध क्षणी शत्रूचं सैन्य संभाजी महाराजांना कैद करतं.
गेली दोन वर्षं प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेची अखेर नेमकी कशाप्रकारे दाखवली जाणार, याविषयी प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे. बुधवारी (19 फेब्रुवारी) प्रक्षेपित झालेल्या भागात संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारात आणल्याचं दाखवलं गेलं. कैदेत असूनही संभाजी महाराजांनी औरंगजेबाला आपल्या तेजस्वी वाणीने गारद केल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं.
छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनपट या मालिकेतून मांडण्यात आला. राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांची भूमिका साकारली. अभिनेते शंतून मोघे यांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. (Chhatrapati Sambhaji Maharaj Serial)
हेही वाचा : स्वराज्य रक्षक संभाजी राजे मालिका संपल्यानंतरच निवृत्ती : अमोल कोल्हे