बापाने शिक्षणासाठी शेत विकलं, पोराने यूपीएससीत घवघवीत यश मिळवलं
सोलापूर : बेताच्या परिस्थितीत शिकून अधिकारी होणं काय असतं हे यशस्वी विद्यार्थ्याशिवाय इतर कुणीही ओळखू शकत नाही. यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा म्हणजेच आयएफएस परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. यामध्ये महाराष्ट्रातील 12 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या 12 विद्यार्थ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांत कुंडलिक खांडेकर याची मेहनतही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे. श्रीकांत खांडेकर हा […]
सोलापूर : बेताच्या परिस्थितीत शिकून अधिकारी होणं काय असतं हे यशस्वी विद्यार्थ्याशिवाय इतर कुणीही ओळखू शकत नाही. यूपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या भारतीय वन सेवा म्हणजेच आयएफएस परीक्षेचा निकाल जाहीर झालाय. यामध्ये महाराष्ट्रातील 12 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या 12 विद्यार्थ्यांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीकांत कुंडलिक खांडेकर याची मेहनतही अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा देणारी आहे.
श्रीकांत खांडेकर हा सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मजुरी करुन जीवन जगणाऱ्या कुटुंबातील विद्यार्थी… श्रीकांतने देशात 33 वा क्रमांक मिळवलाय. मंगळवेढ्यातील बावची गावात राहणारे त्याचे वडील अशिक्षित आहेत, पण त्यांनी मुलांच्या शिक्षणाचं महत्त्व वेळीच ओळखलं होतं. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी तीन एकर जमीन विकली, पण शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही.
कुटुंबीय आपल्यासाठी करत असलेल्या कष्टाची श्रीकांतने जाणीव ठेवली आणि त्याने स्वतःही जीव ओतून अभ्यास केला. श्रीकांतचं सुरुवातीचं शिक्षण गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत झालं. निंबोणी इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर सोलापुरातून बारीवपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. दापोलीच्या कृषी विद्यापीठातून त्याने कृषी अभियात्रिकीचं शिक्षण घेतलं. याच काळात त्याची आयआयटीतही निवड झाली. पण त्याने तिकडे न जाता यूपीएससी परीक्षा देण्याच्या त्याच्या निर्णयावर ठाम होता.
वाचा – बाप बँड वाजवत होता, मुलगा यूपीएससी पास झाल्याची बातमी आली
खरं तर अभियांत्रिकीचं शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयआयटीमध्ये निवड होणं हे एका स्वप्न पूर्ण होण्यापेक्षा कमी नसतं. पण प्रत्येकाचं एक स्वप्न असतं आणि त्यासाठी तेवढी जिद्दही महत्त्वाची असते. श्रीकांतने पुण्यात एक वर्ष अभ्यासाला सुरुवात केली. नंतर सहा महिने दिल्लीत अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात त्याने देशात 33 वा क्रमांक मिळवलाय. ओबीसी प्रवर्गात राज्यातून तो दुसरा आहे.
मुलाच्या या यशाने कुटुंबीय भारावून गेलेत. मुलाने आपली मेहनत सार्थकी लावली, अशी भावूक प्रतिक्रिया श्रीकांतचे वडील देतात. मराठी माध्यमात शिक्षण घेतलेल्या मुलांसाठी यूपीएससी स्तरावर इंग्रजीत देशपातळीवरच्या स्पर्धेत टिकणं हे मोठं आव्हान असतं. पण महाराष्ट्रातल्या मुलांनी हे आव्हान कायमच पेललंय आणि श्रीकांतनेही हेच पुन्हा सिद्ध केलंय. श्रीकांत सध्या 27 फेब्रुवारीला होणाऱ्या मुलाखतीसाठी तयारी करतोय. यूपीएससी नागरी सेवा परीक्षेची मुख्य परीक्षाही तो पास झालाय. त्यामुळे 27 फेब्रुवारीला होणाऱ्या मुलाखतीची तो तयारी करत आहे. यामध्येही यशस्वी झाल्यास त्याचा आयपीएस, आयएएस, भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) यासह इतर सेवांमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल. श्रीकांतला मुलाखतीसाठी टीव्ही 9 मराठीकडूनही शुभेच्छा!