सिंधुदुर्ग : जिल्ह्यात पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईतून आलेल्या या कोरोनाबाधित रुग्णाचा 23 मे रोजी मृत्यू झाला होता. मात्र, आज आलेल्या कोरोना चाचणी अहवालात संबंधित संशयित कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं स्पष्ट झालं (Sindhudurg Corona Updates). देवगड तालुक्यातील टेंबवली येथील ही 79 वर्षीय महिला 19 मे रोजी मुंबई येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात आली होती. त्यानंतर तिला दुसऱ्या दिवशी रुग्णालयामध्ये दाखल करून तिचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. मात्र अहवाल येण्याआधीच 23 मे रोजी तिचा मृत्यू झाला होता.
या मृत्यूसह सिंधुदुर्ग पहिल्या कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आज नवे 06 रूग बाधीत सापडले. गेल्या 24 तासात जिल्ह्यात 13 नविन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी (28 मे) दिवसभरात 07 तर आज 06 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांती संख्या 30 इतकी झाली आहे. यापैकी आतापर्यंत 07 रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. आता उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 23 झाली आहे. यात वैभववाडी 01, कणकवली 01, देवगड 01, कुडाळ 01, सावंतवाडी 01, वेंगुर्ला 01 या रुग्णांचा समावेश आहे.
सिंधुदुर्गमध्ये मुंबईतून येणाऱ्यांच्या बोगस पासचा प्रश्न ऐरणीवर
दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये मुंबईतून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढली आहे. यातच आता चाकरमानी बोगस पासचा उपयोग करत असल्याचे प्रकारही समोर येत आहे. मात्र, या प्रकरणी वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असल्याचंही समोर आलं आहे. सावंतवाडी तहसीलदारांनी या प्रकरणी जिल्हा प्रशासनाला घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळत आहे. सावंतवाडी कारीवडेतील 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बोगस पासवर जिल्ह्यात आले. याबाबत आपण पुराव्यांसह ही बाब वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानावर घातली. मात्र, आपलं कोणीही ऐकून घेत नाही, असा आरोप तहसीलदारांनी केला आहे.
बोगस पास प्रकरणी तहसिलदारांचं जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट
मुंबईतून सावंतवाडीत आलेल्या अनेक लोकांचे पास आम्ही स्कॅन केले. त्यातील बरेच पास हे बोगस निघाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 15 हजार लोक बोगस पास घेऊन आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असलं तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांचं मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचं दिसत आहे. तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे बोट दाखवलं आहे. जिल्ह्यात अशीच स्थिती सुरु राहिल्यास जिल्ह्यातील स्थिती हाताबाहेर जाईल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया तहसीलदार म्हात्रे यांनी दिली आहे.
आतापर्यंत 50 हजार चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल
मुंबई गोवा महामार्गावरील खारेपाटण तपासणी नाक्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खारेपाटण तपासणी नाक्यावर दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तळकोकणात येण्यासाठी चाकरमान्यांची पुन्हा गर्दी झाली आहे. आतापर्यंत 50 हजार चाकरमानी सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मुंबईच्या कंटेनमेन्ट झोनमधूनही चाकरमानी आपआपल्या गावी येत आहेत. यात धारावी, सांताक्रूझ, दादर, कल्याण, डोंबवली, पनवेल या भागात राहणाऱ्या चाकरमान्यांचा समावेश आहे.
बोगस पासच्या प्रकारानंतर आता ई-पास, आधार कार्ड आणि इतर सर्व कागदपत्रे तपासूनच जिल्ह्यात प्रवेश दिला जातो आहे. प्रवाशांची आरोग्य विभागाकडून तपासणी देखील केली जाते आहे. वाहनांची गर्दी नियंत्रणासाठी महसूल आणि आरोग्य विभागाच्यावतीने पथकांती संख्या वाढविण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 200 पार
दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 200 पार गेला आहे. आता आणखी 13 जणांना कोरोनाची लागण झाल्याने एकूण कोरोना रुग्णांची संख्या 208 झाली आहे. रत्नागिरीत आतापर्यंत 83 जणांची कोरोनावर मात केली असून सध्या 120 जणांवर उपचार सुरु आहेत. या व्यतिरिक्त रत्नागिरीत एकूण 5 कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
संबंधित बातम्या :
एकाच दिवसात 116 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह, सहा दिवसात चारशेहून अधिक पोलिसांना लागण
जुळ्या बाळांना जन्म देऊन सुखरुप ठेवलं, कोरोनाग्रस्त माऊलीने 24 तासात डोळे मिटले!
Corona : पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, रुग्णांचा आकडा 7012 वर
Sindhudurg Corona Updates