अभिजीत केळकर, पौर्णिमा डे यांच्यासह ‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची लागण
'सिंगिंग स्टार'चे स्पर्धक अभिनेता अभिजीत केळकर, अभिनेत्री पौर्णिमा डे, शोमधील मेंटॉर रोहित राऊत, जुईली जोगळेकर आणि दोघा क्रू मेम्बरना कोरोना झाला आहे
मुंबई : अभिनेता सुबोध भावेनंतर मराठी मनोरंजन विश्वातील आणखी काही कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’चे स्पर्धक असलेले अभिनेता अभिजीत केळकर आणि अभिनेत्री पौर्णिमा डे यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर या शोमधील मेंटॉर आणि गायक रोहित राऊत, गायिका जुईली जोगळेकर आणि दोघा क्रू मेम्बरनाही कोरोना झाला आहे. (Singing Star Actor Abhijeet Kelkar Purnima Dey tested COVID Positive)
अभिजीत केळकरने आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा स्पर्धकही होता. सध्या तो ‘सिंगिंग स्टार’ या सेलिब्रिटी सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे.
“नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोनाची लागण झाली. माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी, खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती. डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली, जी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे. माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत. तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत” अशी पोस्ट अभिजीतने इन्स्टाग्रामवर केली आहे.
‘सिंगिंग स्टार’ शो मधील अभिजीतची सहस्पर्धक आणि ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री पौर्णिमा डे हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा मेंटॉर असलेला गायक रोहित राऊत आणि अभिनेता अंशुमन विचारेची मेंटॉर असलेली गायिका जुईली जोगळेकर यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. त्यामुळे ‘सोनी’वरील सिंगिंग स्टार शोचे शूटींग दहा दिवसांसाठी थांबवले असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.
अभिनेता सुबोध भावे याने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती कालच सोशल मीडियावरुन दिली होती. सुबोधची पत्नी मंजिरी आणि मोठा मुलगा कान्हा या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
संबंधित बातम्या :
‘सिंगिंग स्टार’मध्ये अभिनयाचे ‘हे’ बारा शिलेदार उतरणार संगीताच्या मैदानात
अभिनेता सुबोध भावेसह पत्नी आणि मोठ्या मुलाला कोरोना
(Singing Star Actor Abhijeet Kelkar Purnima Dey tested COVID Positive)